धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशपांडे सरांनी, माझ्या जोरदार, दमदार माझ्यापुरताच मर्यादित असलला आवाज ऐकून म्हटले. ‘जगदीश तू देशभक्तीपर गाणे लिही.’ मी पाचव्या गल्लीच्या धाब्याच्या मातीच्या घरावर गेलो आणि गाणे लिहिले.‘देशासाठी करू बलिदान, या भारताचे आम्ही नौजवान’. मी तेव्हा माझ्या शाळेपुरता कवी झालो... धुळ्याचे जिल्हाधिकारी शशिकांत दैठणकर होते. ‘त्या वेळी जि.प. सभागृहात’ ‘काळ चालला पुढे’ हे विधान दिले आणि कविता करायला सांगितली. मी गुरुवर्य नागेश मोगलाईकरांच्या ओट्यावर बसलो आणि ‘कोण म्हणतं, काळ चालला पुढे?’ ही कविता लिहिली. तेव्हापासून ‘मी गावाचा कवी झालो’. भुसावळला वीज मंडळात नोकरीला लागलो. अमळनेरचे वा.रा.तात्या सोनार यांच्या घरात बसून दिवाळीच्या दिवशी एक कविता लिहिली.भैया उपासनी यांनी जळगाव आकाशवाणीच्या उगवतीचे रंग या कार्यक्रमाची सुरुवात केली. तेव्हा मी खान्देशचा कवी म्हणून परिचित झालो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिक येथे प्रथमच अहिराणीत कथाकथन सादर करण्याचा मान मला देशपातळीवर मिळाला. हे मी फक्त कॉमर्सचा विद्यार्थी असून, माझी पातळी ओळखून केलेला माझा लेखन प्रवास आहे आणि लहानपणी मी रडताना माझी आई देवकाबाई अहिराणीत अंगाईगीत म्हणायची, ‘येवं येवं गाई, भाऊ मना निजी जाई’ म्हणणारी माझी देवकाआई माझ्या लेखनाची खरीखुरी प्रेरणा आहे.- जगदीश देवपूरकर
देवकाआई ठरली खरीखुरी प्रेरणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 12:11 PM