वन्यजीव संरक्षण संस्थेची मागणी : महामार्ग प्राधिकरण संचालकांना निवेदन
(फोटो मेल केले आहेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत तयार होत असलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीला लागून तयार करण्यात येणाऱ्या सेपरेटरचे संपूर्ण काॅंक्रिटीकरण न करता, त्याठिकाणी हरित पट्टा विकसित करावा, अशी मागणी वन्यजीव संरक्षण संस्थेने केली आहे. याविषयी बुधवारी वन्यजीव संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग संचालकांना निवेदन दिले. विशेष म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला शक्य नसल्यास वन्यजीव संरक्षण संस्थेच्या माध्यमातून वृक्षाराेपण करण्याची तयारी असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातून प्रभात चौक, दादावाडी परिसर व गुजराल पेट्रोल पंप याठिकाणी महामार्गालगत तीन उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. याठिकाणी पुलाखाली काँक्रिटचे सेपरेटर बांधण्याची तयारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून केली जात असून, यामुळे भविष्यात याठिकाणी अतिक्रमण होऊन वाहनांनादेखील अडचणीचे ठरू शकते. उड्डाणपुलाच्या भिंतीला वाहनांची धडक बसू नये म्हणून दीड ते दोन मीटरचे सेपरेटर पुरेसे आहे. मोठा पूल असल्यास ४ ते ५ मीटरचे सेपरेटर पुरेसे होऊ शकते. या पुलाखालून नियमित अवजड वाहने वापरणार नाहीत, किमान तेवढी जागा सोडून इतर पट्ट्यात झाडेझुडुपे लावल्यास पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य राहील. प्रदूषणदेखील कमी होण्यास मदत होईल, हा विचार करायला हवा, असे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सेपरेटरच्या भागात गरजेपेक्षा जास्त रुंद काॅंक्रिट जंगल तयार करू नये. तसेच आवश्यक तेवढे दीड-दोन मीटरचे सेपरेटर तयार करुन ज्याभागात वाहने वळण घेतात, तिथे लहान आकाराची झाडेझुडपे लावल्यास अपघात होणार नाहीत. पशुपक्षी आणि पर्यावरणालादेखील याचा मोठा फायदा होईल. संबंधित ठेकेदार कंपनीला तत्काळ तशा सूचना देऊन आवश्यक तितके काँक्रिटीकरण करून उर्वरित जागेत वृक्षारोपण करण्याबाबत सूचना द्याव्यात, असे निवेदन देण्यात आले आहे.
कोट..
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला शक्य नसेल तर या परिसरात वन्यजीव संरक्षण संस्थेतर्फे झाडे लावू शकतो. तशी परवानगी द्यावी अन्यथा संबंधित ठेकेदाराला त्या जागेत झाडे जगविण्याची सूचना द्यावी. - बाळकृष्ण देवरे, सदस्य, वन्यजीव संरक्षण संस्था
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात याप्रकारे उड्डाणपुलाखाली सर्व्हिस रोडवर सेपरेटर बांधण्यात येणार आहेत. जर त्या सर्वच ठिकाणी ९ मीटर जागा काँक्रिटीकरणात वाया जाणार असेल तर यावर विचार व्हायला हवा.
- सतीश कांबळे , वन्यजीव अभ्यासक.
वळणावर झाडे लावल्यास व्हिजन कट होऊन अपघात घडतील, अशी भीती व्यक्त हाेते. परंतु, दाेन ते तीन फुटांपर्यंत वाढणारी लहान शोभिवंत झुडपे अथवा शिंदीसारखे सरळ वाढणारे झाड लावल्यास व्हिजन कट होणार नाही. - रवींद्र फालक, अध्यक्ष, वन्यजीव संरक्षण संस्था.