ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.20 : ग्रामीण भागात साक्षरतेचे प्रमाण वाढले पाहिजे. हे प्रमाण कमी असल्याने दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येतात. त्यावर मात करण्यासाठी साक्षरता तसेच डिजिटल साक्षरता वाढल्यास अनेक अडचणी व समस्या दूर होतील. विकासाला चालना मिळेल, असा विश्वास सहाय्यक जिल्हाधिकारी तथा पाचोरा विभागाच्या प्रांताधिकारी मनीषा खत्री-शर्मा यांनी ‘लोकमत’ शी साधलेल्या संवादाप्रसंगी व्यक्त केला.
सोमवारी ‘लोकमत’ कार्यालयास त्यांनी सदिच्छा भेट दिली. प्रारंभी निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्याशी झालेला संवाद असा..
प्रश्न : कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांकडे कसे वळलात?
मनीषा खत्री-शर्मा - मी मूळची हरियाणा राज्यातील. कुटुंबातील सदस्य शेती व व्यवसायात आहेत. कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर प्रथम काही महिने मुंबईत खाजगी क्षेत्रात नोकरी केली.
मात्र तेथे मन रमले नाही. जनतेची सेवा करण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी केली व आयएएस म्हणून माझी निवड झाली. महाराष्ट्रात काम करायची संधी मिळाली.
प्रश्न - खाजगी क्षेत्रात आव्हान आहे की शासकीय सेवेतील कामकाजात?
मनीषा खत्री - शासकीय सेवेत निश्चितच आव्हान असते. जिल्हाधिकारी पदाच्या जबाबदारीत सर्व प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. दररोज नवीन आव्हानांना सामोरे जावे लागत असते.
प्रश्न - ग्रामीण भागातील आव्हाने काय आहेत?
मनीषा खत्री - ग्रामीण भागात खरे आव्हान म्हणजे तेथील जनतेचे शिक्षण. शिक्षण फारसे नसल्याने नागरिकांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असते. तेथे बदल करायचे असतील तर ते शिक्षणाच्या माध्यमातनूच शक्य आहे. शिक्षण असे असावे की ते पदवीर्पयत मर्यादित नाही तर त्यातून व्यावहारिकता शिकविली जावी.
प्रश्न - महाराष्ट्राविषयी आपले अनुभव व मत काय?
मनीषा खत्री - अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात अधिक सुरक्षितता आहे. महिलांच्या बाबतीत ती अधिक आहे. विविध क्षेत्रात महिलांचा सहभाग त्यामुळेच जास्त आहे. हरियाणा, दिल्ली येथे फारशी सुरक्षिततेचे भावना महिलांमध्ये नाही.
प्रशासकीय सेवेत महाराष्ट्राचा टक्का वाढतोय
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत गेल्या काही वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्राचा टक्का वाढत आहे. हरियाणा, राजस्थानमध्ये हे प्रमाण जास्त आहे. दिल्लीच्या जवळ ही राज्ये असल्याने सहाजिकच दिल्ली येथे विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीसाठी जात असतात. मात्र महाराष्ट्रात पुणे येथेही विद्यार्थी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करीत असतात व यशस्वी होत आहे.
जिल्ह्यात स्वच्छतेचा प्रश्न गंभीर
जळगाव जिल्ह्यात सर्वात गंभीर परिस्थिती असेल तर ती स्वच्छतेबाबत. जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तर अतिशय अस्वच्छता आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. भुसावळ तर देशात दुस:या क्रमांकाचे अस्वच्छ शहर आहे. सर्वच शासन करणार हे योग्य नाही. नागरिकांनी ठरविले तरच स्वच्छ भारत मिशन यशस्वी होईल. शौचालयांचा वापर केला तर आपले आरोग्य हे निरोगी राहील हे जनतेला पटवून देण्याची आज गरज आहे.
डिजिटल जागृती होतेय
मनीषा खत्री म्हणाल्या, ई गव्हर्नन्सच्या माध्यमातून अनेक बदल होत आहेत. यातूनच दलाली करणा:यांनाही चाप बसणार आहे. गावात सेतू केंद्र आहेत. तेथे जाऊन नागरिक आपली कामे करून घेऊ शकतात. डिजिटल जागृती हळू हळू वाढत आहे. आज सात-बारा संगणकीकरणासारखी कामे काही भागात शंभर टक्के झाली आहेत.