लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य सरकारने नवीन बांधकाम नियमावली मंजूर केली आहे. त्या नियमावलीने शहरांसह गावातील इतर भागांचाही विकास होणार आहे. या नियमावलीमुळे राज्यातील बांधकाम क्षेत्रात सुटसुटीतपणा आला आहे. बृन्ह मुंबई महापालिका वगळता संपूर्ण राज्यात एकच नियमावली असल्याने शहर रचनाकार, बांधकाम व्यावसायिक यांना काम करण्यात सुटसुटीतपणा येणार आहे.
नवीन नियमावली राज्य सरकारने नुकतीच मंजूर केली आहे. त्यात महापालिका हद्दीपासून दीड किमी अंतरापर्यंत, नगरपालिका हद्दीपासून एक किमी आणि गावठाणाच्या हद्दीपासून ५०० मीटर अंतरापर्यंत बिनशेती विकास कामे करण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचा फायदा राज्यातील बांधकाम व्यावसायिकांना होणार आहे. तसेच बिनशेती जागेची उपलब्धता वाढणार असल्याने भविष्यात जागेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
या नियमांचा फायदा जळगाव महापालिका हद्दीपासून जवळ असलेल्या सावखेडा, आव्हाणे, मन्यारखेडा, कुसुंबा, मोहाडी या गावांना होणार आहे. तेथील जमिनीचा विकास होण्यास मदत होणार आहे.
गेल्या पाच वर्षांपासून जागेचे भाव स्थिर आहेत. तसेच या भावांमध्ये भविष्यातदेखील फारशी वाढ होणार नसल्याची चिन्हे आहे.
कामात सुटसुटीतपणा
या आधी प्रत्येक महापालिकेचे नियम वेगळे होते. त्यामुळे एका विकासकाला दुसऱ्या शहरात जाऊन काम करण्यात तसेच एका नगररचना अधिकाऱ्याला बदली झाल्यावर दुसऱ्या शहरात जाऊन काम करण्यात अडचणी येत होत्या. त्यांना आधी त्या महापालिकेचे नियम समजून घ्यावे लागत होते. मात्र आता तसे होणार नाही. संपूर्ण राज्यात एकच बांधकाम नियमावली असल्याने त्याचा फायदा होणार आहे आणि सर्व कामांमध्ये सुटसुटीतपणा येईल.
कोट - बांधकाम नियमावली ही राज्यभरासाठी एकच असल्याने आता काम करणे सोपे जाणार आहे. त्यासोबतच जळगाव शहराच्या जवळ असलेल्या गावांचा विकास होण्यासही मोठी मदत मिळणार आहे.
- विनय पारेख, बांधकाम व्यावसायिक
कोट - राज्यात एकच बांधकाम नियमावली असल्याने आता घरांच्या किमती स्थिर राहतील, अशी अपेक्षा आहे. त्यासोबतच राज्यात एकच नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यामुळे काम करण्यास सोपे होणार आहे.
- ज्ञानेश्वर पाटील, अभियंता