राजकीय परिस्थिती पाहता शिवसेना व भाजप आमने-सामने आहेत. भाजप काही प्रश्नांवर आक्रमक झालेला दिसून येत आहे. भाजपचे बारा आमदार विधानसभेत निलंबित झाल्याने येथे या पक्षातर्फे आंदोलन करण्यात आले. सेनेच्या विरोधात या पक्षाची आक्रमक भूमिका घेतलेली दिसून येते असते. आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. पालिकेची निवडणूक असल्याने नागरी प्रश्नांवर भाजप आक्रमक भूमिका घेऊन आहे. मग तो पाणी प्रश्न असो वा स्वच्छतेचा. पालिका पदाधिकाऱ्यांवर सतत टीका करून नागरिकांची कामे करण्याचा या पक्षाचा प्रयत्न असतो. विशेषत: शहरातील पाणी प्रश्न या पक्षाकडून लावून धरण्यात येत असतो. कारण गेल्या अनेक वर्षांत कोणत्याही पक्षाकडून हा प्रश्न सोडविण्यात अद्याप यश आलेले नाही. प्रश्नाचे भांडवल मात्र अनेक पक्षांनी केले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेले आरोप-प्रतिआरोप हे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे.
साफसफाईवर भर द्यावा
कोरोनाने गेल्या काळात या शहराला हैराण केले होते. अनेक कुटुंबे यामुळे संकटात आली. काहींचे बळी गेले. सद्य:स्थितीत कोरोनाचा कहर थांबला आहे. आला पावसाळा, आरोग्य सांभाळा, असे नेहमी पावसाळ्यात म्हटले जाते. आता पावसाळा जोमाने सुरू झाला आहे. या काळात साथ रोगांची भीती व्यक्त केली जात असते. हे लक्षात घेऊन पालिकेने शहरातील साफसफाईच्या कामांकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. आरोग्य विभागावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले जावे, अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून केली जात असते.
----
वार्तापत्र