लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद
: ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतर सरपंच निवडीची प्रतीक्षा सर्व
ग्रामस्थांना आता लागली आहे. सुमारे सव्वाकोटींपेक्षा अधिक असलेली घरपट्टी
व पाणीपट्टी करांची थकबाकी आणि त्यामुळे विकासकामांना बसलेली खीळ लक्षात
घेता नवनियुक्त सरपंचांसमोर त्यातून वाट काढण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांनाही खूप अपेक्षा आहेत.
ग्रामपंचायतीकडून दरवर्षी घरपट्टी व पाणीपट्टी व अन्य करापोटी सुमारे २० लाख रुपयांची आकारणी ग्रामस्थांना केली जाते. त्याबद्दल प्रशासनाकडून रीतसर बिलेसुद्धा
बजावली जातात. प्रत्यक्षात फारच थोडे ग्रामस्थ नियमितपणे भरणा करीत
असल्याने विविध करांच्या थकबाकीचा आकडा आतापर्यंत एक कोटी ३० लाख
रुपयांच्या घरात गेला आहे. ग्रामस्थांकडे येणे बाकी असलेल्या करांच्या थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असतांना दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता,
पाणी योजना देखभाल व दुरुस्ती तसेच कर्मचाऱ्यांचे वेतन, यासाठी आर्थिक
तरतूद करताना ग्रामपंचायतीच्या अगदी नाकीनऊ आले आहेत. पुरेशा निधीअभावी
विकासकामांना खीळ बसल्याच्या स्थितीत नियमित कर भरणाऱ्या ग्रामस्थांमध्ये
मोठी नाराजी पसरली आहे.
--------------
कर्मचाऱ्यांना नाही वेतन
ग्रामपंचायतीत
सन २००० पूर्वी तब्बल १० सफाई कर्मचारी कार्यरत होते. मात्र, सद्यःस्थितीत
फक्त एकच महिला कर्मचारी कार्यरत असून काही वर्षात एकही नवीन सफाई
कर्मचारी भरती करण्यात आलेला नाही. सांडपाण्याच्या गटारी व सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता करण्यासाठी त्यामुळे ग्रामपंचायतीला रोजंदारी मजुरांवर अवलंबून राहावे लागत आहे. वेळेवर पगार होत नसल्याने गेल्या काही
वर्षात चार सफाई कर्मचाऱ्यांनी कंटाळून नोकरीचा राजीनामा देऊन टाकला आहे.
दोन कर्मचारी मयत झाले असून, तीन कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत. सध्या
कामावर असलेल्या कार्यालयीन, पाणीपुरवठा व अन्य विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतनदेखील अनियमित आहे. त्यांच्या प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमाही भरण्यात आलेल्या नाहीत.
--------------------
ग्रा.पं. इमारतीची पडझड
ममुराबाद
ग्रामपंचायतीची स्थापना ब्रिटिश काळात सन १९२८ मध्ये झाली आहे. स्वमालकीची बरीच शेती असलेल्या या ग्रामपंचायतीला नागरिकांकडून घरपट्टी व पाणीपट्टी करांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्नदेखील मिळत असते.
त्यानंतरही ग्रामपंचायतीने स्वतःची अद्ययावत इमारत आतापर्यंत उभारलेली
नाही. जुन्या इमारतीची पडझड सुरू झाली आहे.