चाळीसगाव : नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वाधिक निधी म्हणजे तीनशे कोटी रुपयांचा मिळवूनही गेल्या ४ वर्षात विरोधकांच्या आडमुठेपणामुळे वेळोवेळी शहराच्या विकासकामांना वेगवेगळ्या पद्धतीने आडकाठी आणून शहरवासीयांना वेठीस धरण्याचे काम शहर विकास आघाडीच्यावतीने करण्यात आले आहे. आता तर स्थायी समितीमधील शहर विकास आघाडीच्या बहुमताच्या बळावर ठेकेदारांवर दहशत व अधिकाऱ्यांना हाताशी धरून निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप करून निविदा ‘मॅनेज’ केल्या जात आहे. यामुळे शहरवासियांच्या कराच्या कोट्यावधी रुपयांचे नुकसान होणार असल्याचा आरोप नगराध्यक्ष आशालता चव्हाण, गटनेते संजय रतनसिंग पाटील व शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.त्यांनी सांगितले की, काही ठराविक वर्गाकडून सोशल मीडियावर नगरपालिकेमार्फत विकासकामे होत नसल्याच्या चर्चा केल्या जातात व जनतेच्या मनातदेखील सत्ताधारी म्हणून आमच्याकडून विकासकामे होण्याच्या अपेक्षा असतात. जनतेमधून लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यावर विधायक टीका झाली तर त्याचे स्वागतच आहे; मात्र दुसरीकडे शहरातील रस्त्यांची कामे का थांबली, विरोधकांची भूमिका काय राहिली, शहराची सर्व विकासकामे ठरविणारी स्थायी समिती ही विरोधकांच्या गेली काही वर्ष ताब्यात आहे, यावर मात्र जाणीवपूर्वक चर्चा होत नाही. नगराध्यक्ष या जरी भारतीय जनता पक्षाच्या असल्या तरी बहुमत विरोधकांकडे असल्याने प्रत्येक विकासकामांना आडकाठी आणली जात होती. शहरात अंतर्गत पाणी पुरवठा योजना व भुयारी गटार योजना जोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत नवीन रस्त्यांची कामे करता येणार नाहीत, असे शासनाचे आदेश आहेत; मात्र विरोधकांनी जाणीवपूर्वक भुयारी गटार योजना दोन वर्ष सुरू होऊ दिली नाही, असेही त्यांनी सांगितले.
अनेक प्रलंबित विषय मार्गी
चाळीसगाव नगरपालिकेत सत्तांतर झाल्यानंतर चाळीस वर्षात झाले नाही, इतका निधी भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर मिळाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्यावेळचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन यांच्या माध्यमातून व तत्कालीन आमदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने शहराच्या विकासासाठी सुमारे तीनशे कोटी रुपयांच्या कामांना भाजप सरकारच्या काळात मंजुरी मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक व शिवसृष्टी, करगावरोड वरील रेल्वे भुयारी मार्ग आदी वर्षानुवर्षे प्रलंबित विषय आमच्या कार्यकाळात मार्गी लागले. अंतर्गत पाणीपुरवठा योजना (६८ कोटी), भुयारी गटार योजना (१४७.५० कोटी), जिमखाना, अभ्यासिका व चौक सुशोभीकरण (५ कोटी), रस्ते विकास निधी (३ कोटी), घनकचरा व्यवस्थापन (८ कोटी), ओपन स्पेस डेव्हलपमेंट (२ कोटी) आदी कामांना मंजुरी मिळाली असल्याचे नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, संजय पाटील व नितीन पाटील यांनी सांगितले.
...तर भरचौकात सत्कार करू
सध्या राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व सेनेची सत्ता आहे. रस्ते व इतर विकास कामांसाठी शासनाकडून निधी आणला तर भाजपतर्फे भरचौकात सत्कार करू आणि त्यांचे कौतुक करू, असे आवाहन घृष्णेश्वर पाटील यांनी शेवटी केले