जळगाव : नाशिक येथे मणक्याच्या उपचारासाठी गेलेले सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक प्रकाश नामदेव मेढे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत सुमारे १ लाख ५९ हजारांचा ऐवज लांबविला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता सद्गुरू नगरात उघडकीस आली़ चोरट्यांनी घरातील लोखंडी कपाट फोडून साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले होते तर गुटखा खावून घरात जागो-जागी थुंकले होते़ दरम्यान, शहरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे़ दोन दिवसातील ही पाचवी घटना आहे.प्रकाश मेढे हे सद्गुरू नगरात पत्नीसह वास्तव्यास आहे़ मुलगी मुंबईला राहते़ त्यामुळे पती-पत्नी घरात एकटेच राहतात़ मेढे हे नुकतेच मे महिन्यात पोलीस उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले. मणक्याचा त्रास असल्यामुळे ते गेल्या १० दिवसांपासून ते पत्नीसह उपचारासाठी नाशिक येथे गेले होते़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ सकाळी मात्र मोलकरीण आशा जेजुरकर ही घराबाहेरील प्रांगणाची साफसफाई करून निघून जायची़ शुक्रवारी सकाळी मोलकरिण ही साफसफाईसाठी आल्यावर तिला घराचा लोखंडी आणि लाकडी दरवाजा उघडा दिसला़ तिने त्वरीत जवळच राहत असलेले मेढे यांचे भाऊप्रमोद मेढे यांच्याकडे धाव घेतली आणि घरात चोरी झाल्याचे सांगितले़सोने, चांदीसह रोकड लंपासप्रमोद मेढे यांनी त्वरित भाऊ प्रकाश मेढे यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्यांना सामान अस्ताव्यास्त फेकलेले तर कपाट फोडलेले दिसून आले़ नंतर प्रमोद यांनी घरात चोरी झाल्याचे प्रकाश मेढे यांना कळविले़ काही तासानंतर प्रकाश मेढे हे कुटुंबीयांसह घरी परतले़ त्यावेळी त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसून आले़ घराच्या आत प्रवेश करताच मधल्या खोलीतील तिघेही लोखंडी कपाट चोरट्यांनी फोडलेले दिसले़ त्यातील साहित्य जमीनीवर अस्ताव्यस्त फेकलेले होते़ तर दुसरीकडे सुमारे ५१ हजारांची रोकडसह १ लाख ८ हजार रूपयांचे सोने व चांदीचे दागिने व महागड्या घड्याळ चोरीला गेल्याचे लक्षात आले़गुटखा खावून थूंकलेघरात चोरी झाल्यानंतर प्रकाश मेढे यांनी त्वरित एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधला़ काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पाहणी केली़ या पाहणीत चोरट्यांनी गुटखा खावून बेसिन, पलंगावरील गादी तसेच कंपाउंडच्या भिंतीवर थुंकल्याचे दिसून आले़ तसेच ठसे तज्ञांचे व श्वान पथक सुध्दा घटनास्थळी दाखल झाले होते़ तुटलेल्या कुलूपावरून श्वानने काही अंतरपर्यंत चोरट्यांचा मार्ग दाखवला़ त्यामुळे या परिसरात सीसीटीव्ही फुटेज असल्यास त्याचा शोध पोलीस घेत आहेत़ याप्रकरणी प्रकाश मेढे यांचे भाऊ विनोद मेढे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़अशोक नगरातही चोरीचा प्रयत्नसद्गुरू नगरातील प्रकाश मेढे यांच्या घराच्या काही अंतरावर असलेल्या अशोक नगरातील आशाबाई शशिकांत भामरे यांच्या घरात सुध्दा चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला़ या घरात काहीही मिळून न आल्यामुळे चोरट्यांना खाली हात परतावे लागले़आशाबाई भामरे या बुधवारी पाचोऱ्याला गेल्या होत्या़ त्यामुळे घरी कुणीही नव्हते़ हीच संधी साधत चोरट्यांनी घरात चोरीचा प्रयत्न केला़ शुक्रवारी सकाळी शेजारी राहणाºया महिला यांना घराचा दरवाजा उघडा दिसला़ त्यांनी त्वरित आशाबाई यांच्याशी संपर्क साधला व घटनेची माहिती दिली़ त्यामुळे भामरे या काही तासातच राहत्या घरी पोहोचल्या़ यावेळी त्यांना मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले़ मात्र, घरात काहीही नसल्यामुळे कुठलीही वस्तू चोरीला गेली नाही़शहरात चोरट्यांचा धुमाकूळगुरूवारी भरदिवसा एका अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी लाखो रूपयांच्या ऐवजावर डल्ला मारला़ होता.असा आहे मुद्देमालचोरट्यांनी कपाटातून ५१ हजार रूपयांची रोकड, ८ हजार रूपये किंमतीची १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ८ हजार रूपये किंमतीची १० गॅ्रम सोन्याची अंगठी, २४ हजार रूपये किंमतीचे ३० गॅ्रम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, ४ हजार रूपये किंमतीचे प्रत्येकी ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या फॅन्सी अंगठ्या, १६ हजार रूपये किंमतीचे २० गॅ्रम वजनाची सोन्याची चैन, २४ हजार रूपये किंमतीचे ३० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, ५ हजार ६०० रूपये किंमतीची ७ ग्रॅम वजनाचे कानातील टॉप्स्, १५०० रूपये किंमतीचे २०० ग्रॅम वजनाची चांदीची समई, ४५० रूपये किंमतीचे ६ भार वजनांच्या चादींच्या तोरड्या, ५ हजार २५ रूपये किंमतीची ७० ग्रॅम वजनाची चांदीची कोयरी, ७ हजार ५०० रूपये किंमतीची १०० ग्रॅम वजनाची चांदीची अत्तरदानी, ४ हजार रूपये किंमतीची घड्याळ, असा एकूण १ लाख ५९ हजार रूपये किंमतीचा ऐवज लांबविला आहे़
जळगावात निवृत्त डीवायएसपीच्या घरात लाखोंचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:48 PM