जळगाव : जळगाव विमानतळावर नाइट लँडिंगची सुविधा सुरू झाल्यामुळे, आता रात्रीचेदेखील विमान उतरत आहे. मात्र, नाइट लँडिंगसाठी बसविण्यात आलेली यंत्रणा सुसज्ज आहे की नाही, त्यातील तांत्रिक उपकरणे व्यवस्थित काम करीत आहेत का? आदी बाबींचे ऑडिट करण्यासाठी मंगळवारी सकाळी दिल्लीहून भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाची अर्थात डीजीसीएची टीम जळगाव विमानतळावर येणार आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून जळगाव विमानतळावर सुरू असलेली नाइट लँडिंगची मागणी पू्र्ण झाल्यानंतर, गेल्या वर्षीपासून विमानतळावर नाईट लँडिंगदेखील सुरू झाले आहे. या सुविधेमुळे सध्या सुरू असलेल्या जळगाव ते मुंबई सेवेत मुंबईहून येणारे विमान रात्रीदेखील उतरविण्यात येत आहे. मात्र, रात्रीच्या वेळी विमान उतरविताना रनवेवर सर्व लाइट लागतात का, पायलटला लँडिंग करतेवेळी रनवेचा अंदाज येतो का, बऱ्याचवेळा खराब हवामानामुळे दृश्यमानता फार कमी असते, अशा वेळी विमान उतरविताना पायलटला काय अडचणी येत आहेत, तसेच इतर उपकरणे व्यवस्थित चालू आहेत का, आदी बाबींची पाहणी करण्यासाठी मुंबईतील डीजीसीएच्या दोन अधिकाऱ्यांची टीम मंगळवारी विमानतळावर येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.