लोकमत न्यूज नेटवर्क
कुऱ्हाड, ता. पाचोरा : कुऱ्हाड खुर्द व बुद्रूकला पाणीपुरवठा करणाऱ्या वाकडी धरण व परिसरातील अवैध शेती वीजपंप व वीज कनेक्शनची जप्त मोहीम दि. १० रोजी सकाळी ग्रामपंचायत व महावितरणतर्फे राबवण्यात आली.
यावर्षीच्या चांगल्या झालेल्या पावसामुळे वाकडी धरण शंभर टक्के भरलेले होते. शेती सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तसेच अवैध पाणी उपसामुळे हे धरण दहा टक्क्यांवर येऊन ठेपले. यामुळे गावाला आठ ते दहा दिवस पाणीपुरवठा होत होता. तसेच अवैध वीजजोडणीमुळे पाणीपुरवठा करणाऱ्या वीजपंपाची केबल जळणे, ट्रान्सफार्मर नादुरुस्त होणे अशा विविध समस्या याठिकाणी निर्माण होत होत्या. या कारणाने ग्रामपंचायत व महावितरणच्या पथकाने थेट धरणावर धाडसत्र राहून राबवून अवैध वीजपंप व केबल वायरी जप्त करण्यात आल्या.
कारवाईत कायम सातत्य ठेवावे जेणेकरून गावाला सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ गोवर्धन लोखंडे, वायरमन आनंदा कोळी, हितेश गोराडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी अशोक बोरशे, विठ्ठल तेली, सिद्धार्थ सुरवाडे, नवनियुक्त ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रदीप महाजन व अशोक देशमुख यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.