चाळीसगाव/पाचोरा/भुसावळ, जि.जळगाव : धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा व भुसावळ येथे सोमवारी आंदोलन करण्यात आले.धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती मध्ये करण्यात यावा ही मागणी गेल्या ६५ वषार्पासून प्रलंबित आहे. याच मागणीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथे तहसील कार्यालयासमोर धनगर बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करुन परिसर दणाणू सोडला. ‘ढोल जागर’ आंदोलन करुन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, 'धनगड' जमात काही राज्यांमध्ये अनुसूचित जमातीत आहे. धनगड, धनगर एकच असून ६५ वर्षापासून अन्याय होत आहे. विद्यमान सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे मान्य केले होते. मात्र सत्तेत येऊन चार वर्ष होऊनदेखील त्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे. यामुळे समाजाला न्याय मिळत नाही. २१ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे. यानंतरही सरकारला जाग न आल्यास राज्यव्यापी धनगर आरक्षण एल्गार महामेळाव्याचे आयोजन करुन उग्र आंदोलन करण्याचा अल्टीमेटम देण्यात आला. आंदोलनात पोपट आगोणे, विठ्ठल शिंगाडे, रमेश जानराव, बापू सोनवणे, अॅड. प्रमोद आगोणे, विलास रावते, अॅड. रवींद्र लांडगे, प्रकाश थोरात, शैलेंद्र सातपुते, धर्मा काळे, शिवराम गढरी, ज्ञानेश्वर वाघमोडे, गणेश जाने, बापू आगोणे, स्वप्नील मेटकर, सागर आगोणे, दत्तात्रय चव्हाण, राहुल बच्छे, विश्वास पाडोळे, दगा शिंदे, विशाल आगोणे सहभागी झाले होते.‘धनगड आणि धनगर’ एकच समाजमहसूल प्रशासनाला सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इतर राज्यांमध्ये धनगड जमात अनुसूचित जमातीत आहे. त्यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून धनगर समाजावर अन्याय होत आहे. सरकार झोपेचे सांग घेऊन बसले आहे. न्याय न मिळाल्यास २१ सप्टेंबर रोजी पुन्हा आंदोलन करण्यात येणार आहे.यानंतर राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला आहे.असेच आंदोलन पाचोरा व भुसावळ येथेही करण्यात आले. संबंधित स्थानिक प्रशासनाला समाजातर्फे निवेदने देण्यात आली.
धनगर समाजाचे ‘ढोल जागर’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 7:49 PM