लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरातील धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या कोविड लसीकरण मोहीम थंडावली आहे. या केंद्राला आठवड्यातून एकदा कधीतरी जेमतेम ५० लसींचा पुरवठा होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. आरोग्य विभागाने त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
जळगाव तालुक्यातील ममुराबादसह विदगाव, आवार, तुरखेडा, खापरखेडा, नांद्रा खुर्द, सावखेडा आदी बऱ्याच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या धामणगाव आरोग्य केंद्रात सुरूवातीला कोविड लसींचा बऱ्यापैकी पुरवठा होत होता. परंतु, शासनाच्या आदेशानुसार ठराविक वयोगटातील नागरिकांनाच लस देणे बंधनकारक असल्याने लसीकरणाला फार प्रतिसाद मिळत नव्हता. यथावकाश लसीकरणासाठी नागरिकांची आरोग्य केंद्रात गर्दी होऊ लागलेली असतांना, आता नेमका लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी आतापर्यंत सुमारे ९०९ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, रोज सरासरी २०० लसींची मागणी नोंदविण्यात येत आहे. प्रत्यक्षात जिल्हा पातळीवरून धामणगावला मोजून फक्त ५० लसींचा पुरवठा केला जात आहे. त्यातही आठवड्यातून ठराविक दिवसच लस पुरविली जात असल्याने लसीकरणासाठी आलेल्या असंख्य नागरिकांना लस न घेताच माघारी परतावे लागत आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांचे त्यामुळे मोठे हाल होत आहेत. कोरोना निर्बंधामुळे सध्या एसटी बस किंवा रिक्षाची कोणतीच सोय नसतांना अनेकजण खासगी वाहनाची सोय करून लसीकरणासाठी जातात. संबंधितांचा वेळेसह पैशांचा अपव्यय त्यामुळे होतो. एकूण स्थिती लक्षात घेता लस पुरवठा नियमित व पुरेशा प्रमाणात करण्याची मागणी होत आहे.