जळगाव : शहरातील १५ शिवभोजन केंद्रांवर सध्या मोफत थाळीला चांगला प्रतिसाद मिळत असला तरी हॉटेल्सची पार्सल सेवा मात्र पूर्णपणे कोलमडली आहे. एप्रिल महिन्यात कडक निर्बंध लादण्यात आले आहेत.
जळगाव शहरात सध्या काही मोजके रेस्टॉरंट हे पार्सल देत आहेत. मात्र त्यांचीही सेवा आता सकाळी ११च्या आत सर्व काही बंद करण्याच्या नियमांमुळे कोलमडली आहे. कुणीही पार्सल घेण्यासाठी घराबाहेर येत नसल्याने अनेक रेस्टॉरंट्नी आपला व्यवसाय सध्या बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी मोफत मिळत असलेल्या शिवभोजन केंद्रांवर मात्र गरीब कुटुंबातील लोकांच्या रांगा लागल्या आहेत. तेथील पार्सल घेऊन अनेकजण घरी जात आहेत, तर विविध सेवाभावी संस्थांतर्फे चालवल्या जाणाऱ्या मोफत भोजन केंद्रांनाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शहरात नि:स्वार्थ जनसेवा फाउण्डेशनतर्फे मोफत भोजन दिले जाते. सध्या हे फाउण्डेशन गरीब, गरजू लोकांसह कोविड रुग्णांचे नातेवाईक व इतरांना मिळून ३५० भोजन पार्सल देत असल्याची माहिती फाउण्डेशनचे अविनाश जावळे यांनी दिली.