- कुंदन पाटील
जळगाव : डोक्यात मुसळी घातली आणि माथेफिरू घनश्यामने घरातच पत्नी आशाबाईला संपविले. नंतर हा बाप जणू साप होऊन लेकाला अन् लेकीलाही डसायला निघणार, याचीही होतीच भीती... चिमुरडे धनंजय आणि मोनिका या दंशातून वाचले खरे; पण पसार होण्यापूर्वी जन्मदात्याने लेकरांच्या आयुष्यात काळाकुट्ट अंधार पेरलेला... अनाथ झालेली ही निरागस पावले आईच्या अंत्यविधीलाही मुकली... दहा दिवसांनी पोलिसांनी दोघा भावंडांना गाववेशीवर आणले.
लेकराने केशदान केले. नवे केस येत गेले तशी नवी समज या लेकरात भिनत गेली. लहान असतानाच तो मोठा झाला होता. शासन दारातून एक मदतीचा हात त्याला येऊन मिळाला. त्यानेही तो घट्ट धरून ठेवला... स्वत:च्या वेदनांवर स्वत:च फुंकर घालत आयुष्याशी लढला आणि अखेर जिंकलाही....‘बुरा ना मानो जिंदगी है’ हाच जणू त्याच्या या विजयाचा जयघोष होता...
भादली (जळगाव) येथील घनश्याम हिरामण रडे याने पत्नी आशाबाईचा खून केला. लहानग्या धनंजय आणि मोनिकाची निरागस पावलेही मायरक्ताने माखली. क्रूर बाप लेकरांच्या जिवावरही उठलेला होता, मात्र ग्रामस्थांनी या दोघांना सावधपणे पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या दिवसापासून घनश्याम फरारच आहे. आशाबाईचा अंत्यविधी लेकरांविना आटोपला, तेव्हा ते दोघेही पोलीस ठाण्यातील छताखालीच होते. तेव्हा घनश्यामचा मुलगा धनंजय नऊ आणि मोनिका आठ वर्षांची होती.
दहा दिवसांनी दोघांना भादलीच्या गाववेशीवर नेले. दशक्रिया विधीत दोघांना सहभागी केले आणि एका खळ्यातच धनंजयचे मुंडण केले. धनंजयला अंघोळही घातली. धनंजयनेही स्वत:च स्वत:चे दु:ख धुतलं. मन धीट केलं. तेथून त्याला पोलिसांनी राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अनुरक्षण संघटनेच्या बालगृहात सोडले.
दोघांच्या वेदना ऐकून बाल व निरीक्षणगृहाचे तत्कालीन सचिव दत्तात्रय नथू चौधरी यांचेही मन हळहळले. दोघांनाही कुशीत घेतले आणि काळ्याकुट्ट अंधाराने वेढलेल्या चिमुरड्यांच्या वाटेवर उजेड पेरायला सुरुवात केली. मोनिकाला दुसरीत, तर धनंजयला चौथ्या वर्गात घातलं आणि बघता बघता धनंजय दहावी उत्तीर्ण झाला. तेही ७० टक्के गुणांनी. बालगृह आनंदले. पुढे धनंजय मुंबईतील विद्याविहार आयटीआयमध्ये प्रवेशित झाला. तिथेही तो वेल्डर शाखेत पहिला आला. मोनिकाही सज्ञान झाली. तीही भादलीला परतली.
धनंजय सुटीच्या दिवशी आजी आणि बहिणीला नक्कीच जातो भेटायला.... कधीतरी रक्ताने माखलेल्या घराचे डाग पुसायला...रडेंच्या देवळात आनंदरंग उधळायला अन् बहीणमायेचा आनंद वेचायला....
माह्या माय-बापचा चेहरा लक्षात नाही; पण माह्या मनूचे (मोनिका) पुढल्या वर्षी लगीन करणार आहे. बापूदादाने (संजय चौधरी) आम्हाले इथंवर आणलं. बालगृहानं जगणं भी शिकवलं. - धनंजय रडे, भादली (जळगाव)
धनंजय आणि मोनिका अतिशय प्रामाणिक - मेहनती. शासनाच्या अखत्यारितल्या बालगृहाने पुन्हा एकदा दोघांना आयुष्य वाहिले, नक्कीच त्याचा आनंद आहे. - संजय दत्तात्रय चौधरी, सचिव, अनुरक्षण बालगृह, जळगाव