लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : हातगाव-अंधारी रस्त्यावर एका शेतात बोगस बंगाली डॉक्टरने दवाखाना थाटत रुग्णांवरच उपचार केल्याचा प्रकार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सोमवारी उघड झाला आहे. दरम्यान, खऱ्याखुऱ्या डॉक्टरांना पाहताच या मुन्नाभाई एमबीबीएसने धूम ठोकली असून, पोलीस त्याच्या मागावर आहे. कोरोना काळात रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार समोर आल्याने बोगस डॉक्टरांवर कारवाई सुरूच ठेवावी. अशी मागणी होत आहे.
हातगाव-अंधारी रस्त्यावर कुठलीही वैद्यकीय पदवी व परवाना नसताना शेतात अवैधरीत्या एका बंगाली डॉक्टरने दवाखाना उभारला असल्याची माहिती मिळाल्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. देवराम लांडे यांनी पथकासह येथे धाव घेतली. येथे याबोगस डॉक्टरने दवाखानाच थाटल्याचे दिसून आले. काही रुग्णांना सलाइन लावण्यात आले होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांना पाहताच या बोगस डॉक्टरने धूम ठोकली.
रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या या डॉक्टरविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. बोगस डॉक्टर विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस हवालदार भालचंद्र पाटील करीत आहेत.
शेतात दवाखाना, रुग्णांना लावले सलाइन
सद्यस्थितीत कोरोना महामारीने रुग्ण त्रस्त आहे. मिळेल तिथे उपचारासाठी गर्दी होत आहे. याचाच फायदा हे बोगस डॉक्टर घेत असल्याचा तालुकाभरात संतप्त सूर आहे. हातगाव - अंधारी रास्त्यावर बोगस डॉक्टरने चक्क शेतात दवाखाना उभारून रुग्णांवर उपचार सुरू केले. सोमवारी तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांसह डॉ. देवराम लांडे यांनी हा प्रकार उघड केला. विशेष म्हणजे या बोगस डॉक्टरने दोन रुग्णांना सलाइनही लावले होती. काही आणखी रुग्ण येथे उपस्थित होते.
वैद्यकीय पदवी मागताच ठोकली
सोमवारी सकाळी १०.३० वाजता डॉ. देवराम लांडे यांनी हातगाव - अंधारी रस्त्यावरील बोगस डॉक्टरच्या शेतातील दवाखान्यात धडक दिली. त्याच्याकडे वैद्यकीय पदवीविषयी विचारणा केली. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे प्रमाणपत्र मागितले असता त्याने दिले नाही. तेथून पळ काढला.
बोगस डॉक्टरांवर कारवाईची मोहीम
हातगाव - अंधारी रस्त्यावरील बोगस डॉक्टरचा प्रकार गंभीर आहे. तालुकाभरात ही शोधमोहीम यापुढेही सुरूच राहणार आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असे प्रकार होत असतील तर जनतेनेही गुप्त माहिती द्यावी. आम्ही कारवाई करूच.
- नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, चाळीसगाव
शासकीय आचारसंहितेचे पालन करावे
कोरोनाकाळात शासनाने आखून दिलेल्या वैद्यकीय आचारसंहितेचे पालन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या सर्वांनीच करावे. रुग्णांची टेस्टिंग करून तत्काळ उपचार करावे. बोगस डॉक्टरांविरोधातील ही मोहीम सुरूच राहील. गुन्हेही दाखल करण्यात येतील. रुग्णांच्या जिवाशी कुणीही खेळू नये.
-डॉ. देवराम लांडे, तालुका वैद्यकीय अधिकारी, चाळीसगाव