- संजय पाटीलअमळनेर (जळगाव) - पत्नी व मुलीला जिवंत पेटवून देत पतीनं स्वतः रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमळनेर येथील प्रताप मिल कम्पाऊंड परिसरामधील हा धक्कादायक प्रकार आहे. सरिता अनिल खैरनार (वय 33 वर्ष) या महिलेला तिचा पती अनिल खैरनारनं पेट्रोल ओतून पेटवलं. या घटनेत सरिता व त्यांची पाच वर्षांची चिमुकली तनुजा गंभीररित्या जखमी झाल्या. यानंतर स्वतः अनिल खैरनारनं मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जखमी मायलेकींना धुळ्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान चिमुकल्या तनुजाचा मृत्यू झाला. बुधवारी (9 मे) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अनिल खैरनार निवृत्त सैनिक होते. ते मूळचे शिंदखेडा येथील दुसानेमधील (धुळे) रहिवासी होते. पहाटे 4.30 वाजण्याच्या सुमारास त्यानं पत्नी सरिता झोपेत असताना तिच्या गळ्यावर चाकूनं वार केला. वेळीच जाग आल्यानं सरितानं त्यास प्रतिकार केला. मात्र हातात असलेल्या बाटलीत पेट्रोल अनिलनं सरिताच्या अंगावर ओतले व पेटवले. हा प्रकार पाहून पाच वर्षांच्या तनुजानं आईकडे धाव घेतली व तीदेखील यात गंभीर जखमी झाली.
घटनेनंतर दोघींना अमळनेरमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सरिता 42 टक्के तर तनुजा 90 टक्के भाजल्याने प्रथमोपचार करून त्यांना धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे सरितावर उपचार करण्यात आले. तिच्या गळ्याला 20 टाके पडले असून तिथे धुळे पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला. यानंतर दोघांनी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र पाच वर्षीय तनुजाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पत्नीच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या अनिल खैरनार लगेचच घरातून पसार झाला व त्यानं रेल्वे मालगाडी खाली उडी घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, अनिल खैरनारनं केलेल्या कृत्याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.