लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : बसस्थानकावरून एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र चोरून दुसरीच्या गळ्यातून सोन्याची पोत चोरताना धुळ्याच्या एका महिलेस रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
३० रोजी सकाळी कल्पना प्रकाश तिसा ही महिला आपल्या मुलाला नाशिक बसमध्ये बसवत असताना एका महिलेने तिच्या गळ्यावर थाप मारून ४० हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. कल्पना तिसा बसमध्ये चढत असताना एक महिला संशयित रित्या आजूबाजूला फिरत होती. म्हणून त्यांनी त्या महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सोनगीर बसमध्ये चढत असताना ज्योती दीपक पाटील या महिलेच्या गळ्यालादेखील थाप मारून तिच्या गळ्यातील पोत त्याच महिलेने लांबवण्याचा प्रयत्न केला असता ज्योतीने तिला रंगेहात पकडले आणि बसस्थानकावर असलेल्या हेडकॉन्स्टेबल निंबा पाटील यांच्या ताब्यात दिले. त्या महिलेने तिचे नाव उषाबाई नारायण रक्षे (एकता नगर, देवपूर, धुळे) असे सांगितले.
गेल्यावर्षीदेखील हेडकॉन्स्टेबल निंबा शिंदे यांनी तिला चोरी करताना पकडले होते. मात्र तिने पोत परत केल्याने महिलेने फिर्याद दिली नाही म्हणून तिला सोडून देण्यात आले होते. कल्पनाबाई तिसा यांनी उषाबाई रक्षे हिला ओळखले व पोत तिनेच चोरल्याची खात्री झाली. मात्र उषाबाईने पोत कोणाजवळ तरी लंपास केली होती. तिसा यांच्या फिर्यादीवरून उषाबाई विरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हेडकॉन्स्टेबल शिंदे यांनी तिला अटक केली आहे.