लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रंगाचा सण म्हणजेच धूलिवंदन. पहाटेपासूनच हातात, गुलाबी, पिवळा लाल असे विविध रंग, रंगांनी भरलेली पिचकारी, एकमेकांना रंगविणे, घराघरात गोडधोड पदार्थ, घरातील सदस्यांबरोबरच शेजारी व मित्र परिवाराची जमणारी गर्दी, असे चित्र डोळ्यांसमोर येते. दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणारा हा सण सोमवारी अत्यंत साध्या पद्धतीने शहरात साजरा करण्यात आला. चिमुकल्यांसह युवकांनी घराजवळील गल्ली-बोळांमध्ये धुरवड खेळत धूलिवंदनाचा आनंद लुटला.
जिल्हा प्रशासनाकडून तीन दिवस कडक निर्बंध घालण्यात आले होते. त्यामुळे होळी व धूलिवंदन साजरा करण्यावर अनेक मर्यादा घालण्यात आल्या होत्या. परिणामी, शहरात धूलिवंदन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. घरोघरी लहान मुलांनी व मोठ्यांनी आपल्या अंगणातच आपापल्या परिवारासोबत काही मित्रांना रंग लावत धूलिवंदनाचा आनंद घेतला.
ठिकठिकाणी रंग बरसे भिगे चुनर वाली...होली खेले रघुविरा यांसारख्या गाण्यांचा आवाज घुमत असतो. यंदा असे चित्र पहायला मिळाले नाही. शहरातील अयोध्यानगर, पिंप्राळा, जुने जळगाव तसेच विविध ठिकाणी चिमुकल्यांची रंगांची उधळण सुरू होती. दुसरीकडे नेहमीच धूलिवंदनाच्या दिवशी गजबजणाऱ्या चौकांमध्ये यंदा शुकशुकाट होता. होता फक्त तो पोलिसांचा बंदोबस्त. बाहेर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती.
विवेकानंदस्कूलमध्ये ऑनलाइन होळी साजरी
विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम पूर्व-प्राथमिक विभागात ऑनलाइन पद्धतीने होळी साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रम प्रमुख कामिनी जावळे यांनी होलिका दहनची कथा मुलांना समजेल, अशा सोप्या भाषेत सांगितली. होळीचे महत्त्व, आपण ती का साजरी करतो? तसेच रंगपंचमीबद्दल सुद्धा माहिती दिली. कोरोना काळात रंगपंचमीचे नियम लहान बालकांनी सुद्धा सांभाळले आणि त्यांनी घरातच आपल्या वरिष्ठांसोबत आणि लहान-मोठ्या भावंडांसोबत अतिशय खेळीमेळी मध्ये रंगपंचमी साजरी केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य ज्ञानेश्वर पाटील व समन्वयिका सविता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.