जळगाव : सध्या देशात लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही राबविली जात असून स्वायत्त संस्थांचा वापर करुन विरोधकांची अडवणूक केली जात आहे. राहूल गांधी यांची खासदारकी रद्द करणे हा देखील त्यातलाच एक भाग आहे, मात्र यातूनच काँग्रेस पक्ष अनेक राहूल निर्माण सरकारचा चेहरा व अपयश जनतेसमोर मांडणार असल्याचे कॉग्रेसचे जळगाव ग्रामीण तालुकाध्यक्ष मनोज चौधरी व निरीक्षक संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
अविचाराने केलेली नोटबंदी, वाढती महागाई, धार्मिक विद्वेष, भडकाऊ भाषणे,जाती-जातीत धर्मा- धर्मात निर्माण केली जाणारी दरी यातून जनतेचे नुकसान होत आहे. हेच मुद्दे जनतेपर्यंत पोहचवले जाणार आहेत. राहूल गांधी यांनी 'भारत जोडो' यात्रा काढून देशभरातील समाजमन ढवळून काढले व देशपातळीवर जे मुलभूत प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नांची उत्तरे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान देऊ शकत नाहीत म्हणून प्रमुख प्रश्नांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी 'वेगवेगळे 'स्टंट' करून देशातील जनतेची दिशाभूल सुरू आहे. संसदेत ७ फेब्रुवारी रोजी अदानी समुहाच्या घोटाळ्याशी संबंधीत चौकशीची मागणी, अदानी-मोदी संबंध काय ? ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांग्लादेशात अदनीचा मोदींसोबतचा प्रवास व टेंडर अदानीला मिळावे असा पंतप्रधानांचा दबाव याचा पुरावा सादर करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू द्यायचे नाही असे ठरवून त्यांच्या जुन्या वक्तव्याचा विपर्यास करुन 'न्यायव्यवस्थेचा' गुजरात पॅटर्न वापरून राहूल गांधी यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तसेच काँग्रेस अध्यक्ष खरगे यांचेही वक्तव्य लोकसभेच्या अधिवेशन काळातील कामकाजातून वगळून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप चौधरी व घोरपडे यांनी केला.