स्टार डमी ८४०
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्यात रेशन कार्डवर मे आणि जून महिन्यांचे धान्य मोफत वाटप करण्याची घोषणा शासनाने लॉकडाऊनच्या काळात केली होती. मात्र, अनेक ठिकाणी दोन महिन्यांचे धान्य एकाच महिन्यात वाटप केल्याचे समोर आले आहे. तसेच अनेकांना मिळालेले धान्य देखील पुरेसे नसल्याचे समोर आले आहे. बहुतेक दुकानदार धान्य कार्ड धारकांना देण्याच्या आधीच अंगठा घेत आहेत. त्यामुळे आधी धान्य घ्या, मग अंगठा द्या, असे आवाहनही पुरवठा विभागाने केले आहे.
कडक निर्बंधाची घोषणा करताना सरकारने अंत्योदय आणि बीपीएल कार्ड धारकांना मोफत धान्य देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने ५ मे रोजी त्याचे नियतन मंजूर केले होते. प्रत्येक महिन्याला ५ किलो धान्य प्रति लाभार्थी मिळणार होते. त्यात ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ दिले जाणार होते. त्यासोबतच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत देखील एवढेच धान्य रेशन कार्ड धारकांना दिले जाणार होते.
जिल्ह्यातील शिधापत्रिका धारक
अंत्योदय - १३७७४९
बीपीएल - ४७०९५०
केशरी - ३२३०११
पांढऱ्या शिधा पत्रिका - ७४९०३
एकूण शिधापत्रिका - १००६६१३
आधी धान्य, मग अंगठा
बहुतेक दुकानदार रेशनकार्ड धारकांचा आधी अंगठा घेत आहेत. नंतर त्याला धान्य देतात. त्यामुळे किती धान्य दिले याची नोंद दुकानदाराला हवी तशी करता येते. त्यामुळे जिल्ह्यात नागरिकांना आधी धान्य ताब्यात घ्यावे, मगच आपला अंगठा पॉस मशीनवर टेकवावा, असे आवाहनदेखील जिल्हा पुरवठा विभागाने केले आहे.
कोट ...
रेशनकार्ड धारकांनी धान्य घेताना अंगठा लावावा. त्याशिवाय धान्य घेऊ नये. तसेच धान्य पुरवठ्याबाबत काहीही अडचण असल्यास पुरवठा विभागाशी संपर्क साधावा.
- सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी
मे आणि जून महिन्यांचे धान्य एकाच वेळी मिळाले आहे. तसेच नियमानुसार किती धान्य आहे हे देखील सांगितले जात नाही. फक्त अंगठा घेऊन धान्य दिले आहे.
- भारती कोळी, रेशनकार्ड धारक
मे महिन्याच्या सुरुवातीला रेशन दुकाने बंद होती. त्यामुळे रेशनच मिळत नव्हते. जेव्हा सुरू झाले तेव्हा देखील दुकानांवर गर्दी असायची. त्यामुळे दुकानदार अंगठा घेत होता. तसेच धान्य देतानादेखील ते किती आहे,
याची माहिती नीट दिली नव्हती.
- राहुल धनगर, रेशनकार्ड धारक
रेशन दुकानांमधून किती धान्य दिले जाते हे नीट सांगितले जात नाही. त्यामुळे अपूर्ण धान्य मिळत आहे. मे आणि जून महिन्यांचे धान्य देखील एकाच वेळी दिले गेले आणि अंगठे घेतले गेले आहेत.
-मुकेश चौधरी, रेशनकार्ड धारक