लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बाटू विद्यापीठांतर्गत बी. टेक, एम्. टेक बॅकलॉग परीक्षेदरम्यान दीड तासानंतरही लाॅगिन होत नसल्याने काहीकाळ गोंधळ उडाला. त्यानंतर पेपर रद्द करण्यात आल्याचा संदेश आल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दरम्यान, या प्रकारामुळे विद्यार्थी, शिक्षक, आय. टी. समन्वयक यांचा गोंधळ उडाला.
जळगाव जिल्ह्यात डॉ़. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ अर्थात ‘बाटू’ विद्यापीठाशी संलग्न केसीई अभियांत्रिकी महाविद्यालय, जे. टी. महाजन, संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालय, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. बाटू अंतर्गत बी. टेक व एम्. टेक अभ्यासक्रमांच्या बॅकलॉग विषयाच्या ऑनलाईन परीक्षा ७, ८ व ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गुरूवारी पहिलाच पेपर हा सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्यामुळे विद्यार्थी ९.४५ पासूनच हातात मोबाईल, लॅपटॉप घेऊन बसले होते. तांत्रिक अडचण आली तर ती सोडविण्यासाठी आय. टी. समन्वयकसुध्दा सज्ज होते.
स्क्रीनवर येत होते ‘एरर’
सकाळी १० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दिलेली लिंक ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, लॉगिनच होत नव्हते. तासाभरापासून हीच तांत्रिक समस्या येत असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयातील आय. टी. समन्वयकांना संपर्क साधून लॉगिन होत नसल्याचे कळवले. मात्र, तरीसुध्दा स्क्रीनवर ‘एरर’ दाखविले जात होते.
मिनिटा-मिनिटाला वाजत होती मोबाईलची रिंग
परीक्षेचा कालावधी सुरू होऊन दहा ते पंधरा मिनिटे झाल्यानंतरही लॉगिन न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आय. टी. समन्वयकांना संपर्क साधण्यास सुरूवात केली. मिनिटा-मिनिटाला मोबाईल वाजत असल्यामुळे आय. टी. समन्वयकही या गोंधळामुळे हैराण झाले होते. शंभर ते दीडशे विद्यार्थ्यांचे कॉल आल्याचे एका प्राध्यापकानी सांगितले.
आणि... परीक्षा पुढे ढकलली गेली...
लॉगिन होत नसल्यामुळे पुन्हा नापास होऊ, या भीतीमुळे विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. शेवटी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ‘एमकेसीएल’चा परीक्षा रद्द झाल्याचा एसएमएस विद्यार्थ्यांना मिळाला. आता ७ तारखेचा पेपर १० जानेवारीला तर ८ रोजीचा १४ जानेवारीला व ९ जानेवारीचा पेपर १७ जानेवारीला होईल, असे कळविण्यात आले. दरम्यान, ऐनवेळी परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली.