चोपडा : शासनाकडून कुपोषित बालकांना तसेच स्तनदा माताव किशोरवयीन मुलींसाठी दिले जाणारे सकस आहार अन्नधान्य येथील मिनी अंगणवाडी सेविकांनी पूर्णपणे वाटप केले.चहार्डी येथील खदान वस्तीवर असलेल्या आदिवासींच्या ० ते ३ वर्षे वयातील कुपोषित बालके, स्तनदा माता, शाळाबाह्य किशोरवयीन मुली, गरोदर माता यांना १० रोजी सकस आहार साहित्य वितरण करण्यात आले. या वस्तीवर मिनी अंगणवाडी उघड्यावर व झाडाखाली भरते. सध्या पावसाळा सुरू असल्याने शेजारी असलेल्या मारोती मंदिराच्या सभा मंडपात हे आहार वितरण पार पडले. जवळपास १०० च्यावर लाभार्थींना हा सकस आहार वाटप करण्यात आला. या आहारात मसूरडाळ, गहू, तेल, मीठ, चटणी, चवळी आणि हळद यांचा समावेश आहे.मिनी अंगणवाडी सेविका मनीषा सुरेश ढोले (भोई) यांनी सर्वांना शांततेत जीवनावश्यक आहार साहित्याचे वाटप केले. या सकस आहारामुळे कुपोषण दूर होण्यास गर्भवती माता, स्तनदा माता आणि शाळाबाह्य किशोरवयीन मुलींना फायदा होणार आहे.