सुनील पाटील ।जळगाव : वेगवेगळ्या कारणांनी कौटुंबिक कलह निर्माण होऊन काडीमोडपर्यंत आलेल्या जिल्ह्यातील २०३ जोडप्यांना एकत्र आणून त्यांची संसारवेल फुलविण्यात आली आहे. हे महान कार्य केले आहे, स्थानिक गुन्हे शाखेच्या महिला सहाय कक्षातील सावित्रीच्या लेकींनी.महिलांच्या तक्रारी, अन्याय व अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला सहाय्य कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून २०१८ या वर्षात २०३ प्रकरणांमध्ये महिलांना न्याय देण्यात आला. निरीक्षक बी.जी.रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नीता कायटे, सहायक फौजदार सुमन कोलते, अन्नपूर्णा बनसोडे, शैला धनगर, वंदना आंबिकर, सविता परदेशी व वैशाली पाटील आदींचे पथक त्यासाठी नेमण्यात आले आहे. या पथकाकडून दररोज पती-पत्नीचे समुपदेशन केले जाते. वादाचे निरसन करीत असताना हाणामारीच्याही घटना घडल्या आहेत. अशा स्थितीत डोक्यावर बर्फ व तोंडात साखर ठेवून काम करावे लागत असल्याचा अनुभव या कक्षातील कर्मचाऱ्यांनी सांगितला.वादाला अनेक कारणांची किनार... सासु-सासऱ्यांशी वाद असेल किंवा पती-पत्नी यांच्यातील किरकोळ वाद हे इतक्या टोकाला पोहचले की, पती-पत्नीने एकमेकांचे तोंड न पाहण्याचा निर्धार केलेला असतो. अशा प्रकरणात बहुतांशवेळा तिसºयानेच खडा टाकलेला आढळून आलेला आहे. सावित्रीच्या या लेकींनी मुळ मुद्यालाच स्पर्श करुन दाम्पत्यांच्या मनातील गैरसमज, सासु-सासरे, आई, वडील व मुलांची होणारी फरपट व त्याचा शेवट काय होतो याचे काही उदहारणे व दाखले दिले व त्यात परिवर्तन झाले. त्यामुळे या कुटुंबांमध्ये पुन्हा हास्य फुलले. त्यांचे सुखाचे संसार फुलले आहेत.
दुरावलेल्या मनांना एकत्र आणून फुलविली संसारवेल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:37 PM
२०३ महिलांना न्याय
ठळक मुद्दे महिला सहाय्य कक्षातील सावित्रीच्या लेकी ठरतांय आधार