जळगाव - मनपाच्या अग्निशमन विभागाचे काम म्हणजे नेहमी अलर्टचे काम. कार्यालयात आलेला एकही फोन जरी उचलला गेला नाही, तर आगीची लहान घटनाही मोठे स्वरूप घेवू शकते. मात्र, अनेकदा अग्निशमनच्या कार्यालयात असे काही फोन येतात, की ज्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचा संतापही अनावर होईल, मात्र थंड डोक्यानेच फोनद्वारे माहिती देणाऱ्यांची अडचण समजून घेवून घटनास्थळी जावून आगीची घटना आटोक्यात आणावी लागते. अनेकदा कार्यालय, प्रशासन व कुटुंबामुळे तणाव असला तरीही अलर्ट राहूनच मोठ-मोठ्या घटनांवर उपाययोजना केली जाते, अशी माहिती मनपा अग्निशमन विभागाच्या रोहिदास चौधरी यांनी दिली.
मनपा अग्निशमन विभागाचे विभागप्रमुख शशिकांत बारी हे आहेत. त्यांच्या अखत्यारित चार ते पाच कर्मचारी अग्निशमन विभागाच्या मुख्य कार्यालयात कार्यरत आहेत. शहरात आगीची घटना घडल्यास २२२४४४ हा क्रमांक नागरिकांसाठी दिला आहे. त्यामुळे हा फोन वाजला म्हणजे, शहरात आगीची घटना घडली असेच जवळपास समजले जाते. या कार्यालयात तीन सत्रांत अग्निशमन विभागाचे कर्मचारी काम करीत असतात. रात्री-बेरात्री देखील आगीच्या घटना घडत असतात. अनेकदा शहरासोबत तालुक्यातील ग्रामीण भागातदेखील घटना घडल्या तरी त्याठिकाणीही जावे लागते, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली. अनेकदा ग्रामीण भागातील घटनेबाबत फोन आले तर थोडा उदासीनपणा येतो, मात्र घटनेचे गांभीर्य घेवून त्याठिकाणीही त्याच तत्परतेने जातो. जी तत्परता शहरातील घटनेबाबत दाखविली जात असते, असेही या कर्मचाऱ्यांनी सांगितले.
कचरा पेटला तरी फोन
दररोज घटना घडत नसली तरी फोन मात्र सातत्याने येतात. यामध्ये अनेकदा गल्ली-बोळातील कचरा पेटत असला तरीही काही नागरिक थेट अग्निशमन विभागाच्या कार्यालयातच फोन करतात, अशा व्यक्तींना समजावण्याचा अनेकद प्रयत्न केला जातो. मात्र, जर अडचण मांडायचीच आहे. तर आम्हीही घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांची तक्रार ऐकून घेतो. अनेकदा राग येतो मात्र तो जिभेपर्यंत पोहोचू दिला जात नाही. यासह दिवाळीच्या काळातदेखील लहान-लहान घटनांसाठीही नागरिक फोन करतात, त्याठिकाणी बंब घेवून जातो मात्र ती आग अनेकदा आम्ही जाण्याअगोदरच विझविली जाते असेही गमतीशीर किस्से घडत असतात.
ताणतणावही दूरच
आरोग्यावर अशा फोनमुळे फारसा परिणाम होत नाही. अनेकदा अफवांचे फोनदेखील येतात, तेव्हाही थोडी दमछाक होते. घरात काही वाद तर होत नाही मात्र जीवन जगताना छोटे-छोटे ताणतणाव तर येतच असतात. मात्र, हा तणाव कार्यालयाबाहेरच सोडून आम्ही दररोज कामावर जातो, अशीही माहिती याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’ ला दिली.