कांचननगरातील जागृत गुरूदत्त मंदिर
जळगाव : कांचननगरातील जागृत श्री गुरूदत्त मंदिरात श्री दत्तजयंतीनिमित्त मंदिराचे विश्वस्त राजेंद्र कोळी व अरुणा कोळी यांच्या हस्ते पहाटे दत्तमूर्तीचा अभिषेक व होमहवन करण्यात आले. श्रीपादकथेची सांगता हभप शालिक महाराज पिंप्राळेकर यांनी केली. त्यानंतर महाआरती मनपाच्या महिला व बाल कल्याण सभापती रंजना सपकाळे व भरत सपकाळे यांच्या हस्ते झाली. यावेळी नगरसेवक दत्तू कोळी व कांचन सोनवणे उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.
श्री स्वामी समर्थ केंद्र
जळगाव : प्रतापनगरातील दिंडोरीप्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्तजयंतीनिमित्त दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांनी गुरुचरित्रातील चौथा अध्यायाचे पी. एन. शिंपी यांनी वाचन करून श्री दत्त जन्मसोहळा साजरा करण्यात आला. यावेळी अजय धुमाळ यांनी सपत्नीक आरती केली. सकाळी १० वाजता दत्तजयंतीनिमित्त सुरू असलेल्या अखंड नाम जपयज्ञाची पूर्णाहुती करून सांगता करण्यात आली.
चिमुकले राममंदिर -
जळगाव : नवीन बसस्थानकासमोरील चिमुकले राममंदिरात श्री दत्तजयंतीनिमित्त सायंकाळी हभप ऋषीकेश महाराज जोशी यांचे कीर्तन झाले. यानंतर ६ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच पारायणाचींही सांगता झाली. यावेळी हभप दादा महाराज जोशी व हभप द्वारकाधीश जोशी उपस्थित होते. यानंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
श्रीगुरुदत्त सेवा मंडळ
जळगाव : दाणाबाजारातील गुरुदत्त सेवा मंडळातर्फे पोलन पेठेतील मंदिरात श्री दत्तजयंती उत्सव साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता गुरुदत्ताची महाआरती जळगाव पिपल्स बँकेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील व श्री गुरुदत्त सेवा मंडळाचे मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय चौधरी यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
आनंदनगरातील स्वामी समर्थ सेवा केंद्र
जळगाव : शहरातील मोहाडीरोड परिसरातील आनंदनगर येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे मंगळवारी दत्तजयंती सोहळा उत्साहात व धार्मिक वातावरणात साजरा झाला. दत्तजयंती निमित्ताने सेवा रांगोळी फुलांसह फुगे अशा आकर्षक अशा पद्धतीने सजविण्यात आले होते. यानंतर केंद्रावर महानैवेद्य आरती, भोपाळ आरती करण्यात आली. तसेच दुपारी खंडेरायांची तळी भरण्यात आली. यानंतर सेवा केंद्राचे जिल्हा प्रतिनिधी विजय निकम यांनी भाविकांना आध्यात्मिक, वास्तुशास्त्र यांसह विविध विषयांवर मार्गदर्शन केले.