मतीन शेख।मुक्ताईनगर : केंद्र सरकारच्या डिजीटल इंडीया उपक्रमाअंतर्गत ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियान जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी नागरिकांचा राबता असलेल्या कार्यालयांमध्ये ‘डिजीटल गुड्डी’ बोर्ड लावले होते. मात्र येथील एकाही कार्यालयात हा बोर्ड सुस्थितीत दिसत नाही, तर काही कार्यालयात हे बोर्ड अडगळीत पडलेले दिसून आले. जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हीच स्थिती आहे. एकंदरीत यावर झालेला खर्च पाण्यात गेला की काय असे चित्र आहे.‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाच्या लोगोचा उपयोग करून तयार केलेल्या या डिजीटल बोर्डला आॅनलाईन जोडणी करुन मुला-मुलींच्या जन्मदराचे अवलोकन करणे तसेच बोर्डला एक आॅडिओ व्हिज्युअल डिस्प्ले युनिट तत्कालीन जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या कल्पनेतून साकारण्यात आले होते. त्यासाठी शाळेत जाणाऱ्या मुलीचा कटआऊट बनविण्यात आला. या मुलीच्या हातातील शाळेच्या पाटीच्या आकारात एक १७ इंची डिजीटल डिस्प्ले बसविण्यात आला. या डिस्प्लेवर मान्यवरांचे संदेश, स्त्री भ्रूण हत्या विरोधी जनजागृतीपर संदेश, महिला सक्षमीकरणाबाबतच्या योजना, महिलासंदर्भात महत्वाचे असणारे टोल फ्री क्रमांक आदी माहिती प्रसारित करण्यात येत असे . जिल्हा व तालुकास्तरावरील शासकीय कार्यालयांमध्ये हे बोर्ड बसविण्यात आले होते. विशेष करून नागरिकांचा राबता असलेल्या तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपंचायत, ग्रामपंचायत, उपजिल्हा आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी हे डिजिटल बोर्ड बसविण्यात आले होते.दरम्यान उपक्रम सुरुकेल्यावर चार वर्षांनंतर या डिजिटल बोर्ड बाबत जाणून घेण्यासाठी येथील विविध कार्यालयात भेटी दिल्या असता तहसीलदारांच्या दालनात लावण्यात बोर्ड नव्हते, पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दलनातील हे बोर्ड काही करता सुरू होत नव्हते, उपजिल्हा रुग्णालयात बोर्ड चोरी होऊ नये यासाठी सुरक्षित ठिकाणी ठेवल्याचे समजले तर नगर पंचायत आतित्वात आल्या पासून बोर्ड गायब आहे.बोर्ड नसलेल्या कार्यालयातील हे डिजिटल बोर्ड कोठे गेले याचा शोध घेतला असता धक्काच बसला. काही ठिकाणी रेकार्ड रूम मध्ये कोठे जिन्यात अडगळीत तर कोठे कार्यालयीन अधीक्षकाच्या खोलीत ठेवलेले दिसून आले.सरकारने केले होते कौतुकसुमारे चार वर्षांपूर्वी जिल्ह्यात लावण्यात आलेल्या बोर्डचा गवगवा चांगलाच झाला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी जळगाव जिल्ह्यातील या अनोख्या डिजीटल उपक्रमाचे कौतुक केल होते.. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाने जुलै २०१५ दरम्यान राबविलेल्या डिजीटल इंडिया अभियानाचा सर्वोत्तम उपक्रम म्हणून जळगावच्या या उपक्रमाला स्वीकारले होते.
डिजीटल बोर्ड पडले अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 3:12 PM