चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना येथील बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे तब्बल आठ वर्ग डिजिटल करण्यासाठी निधी उभारला आहे. मंगळवारी या आदर्शवत उपक्रमाचे लोकर्पण होणार आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे यांची प्रेरणा यासाठी महत्वाची ठरली.
बेलगंगा साखर कारखाना वसाहतीवर बेलगंगा टेक्निकल माध्यमिक विद्यालय आहे. या शाळेने आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविले आहे. शाळेचे मुख्याध्यापक जी. एन. ढगे यांनी काही माजी विद्यार्थ्यांजवळ आपला मानस बोलून दाखवला आणि शाळेचे डिजिटलायजेशनाचे रोप रोवले गेले. आणि पाहता पाहता माजी विद्यार्थ्यांकडून मदतीचा ओघ सुरू झाला. फेसबुक, व्हॉटस्अॕपच्या माध्यमातून सगळे माजी विद्यार्थी ढगे यांच्याशी जोडले गेले. काहींनी थेट शाळेत येवून मदत केली तर काहींनी आपल्या मित्रांच्या हातोहात मदत पोहच केली. माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीतून आठ वर्गांसाठी प्रत्येकी ५० इंची स्मार्ट अॅण्डड्रॉइड टीव्ही संच आणि वर्गाचा संपूर्ण अभ्यासक्रम असलेला पेन ड्राईव्ह खरेदी करण्यात आला आहे. या भरघोस निधीसाठी सन १९९० ते २००५ पर्यंतच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत केली आहे.
# मंगळवारी उद्घाटन
दोन रोजी मंगळवारी सकाळी ९ वाजता बेलगंगा शाळेत शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांच्या हस्ते आणि चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. विनोद कोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या आदर्शवत कामाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी केंद्रीय राज्यमंत्री एम. के. पाटील हे असतील. या कार्यक्रमाला गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, शिक्षण विस्तार अधिकारी विलास भोई हे देखील उपस्थित राहणार आहेत.