लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य सुरू असून, जळगाव ते भुसावळच्या दिशेने नवीन रेल्वे उड्डाणपुलाच्या निर्मितीनंतर त्यास समांतर असणारा जीर्ण झालेला जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल महामार्ग प्राधिकरणाने जमीनदोस्त करण्यात सुरुवात केली आहे. या ठिकाणी समांतर असा नवीन भुसावळ ते जळगाव या दिशेने रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. या पुलाखाली अनेक घातपात झाले आहेत. पुलावरही अनेक अपघाताचा हा पूल साक्षीदार होता. तो आता इतिहासजमा झाला आहे.
महामार्ग चौपदरीकरणाचे कार्य अति जलद गतीने सुरू आहे. फुलगाव ते तरसोद भुसावळ हद्दीत होणाऱ्या ३२ किलोमीटर महामार्गाच्या कामात चार रेल्वे उड्डाणपूल आहेत. ४ जून रोजी सायंकाळी सहाला भुसावळ महामार्गावरील जळगावच्या दिशेने जाणारा नवीन रेल्वे उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. त्यानंतर आता ब्रिटिशकालीन जीर्ण झालेला रेल्वे उड्डाणपूल जमीनदोस्त करण्याच्या कार्याला सुरुवात झाली आहे. या कामासाठी जवळपास एक महिना लागणार आहे. यानंतर या ठिकाणी भुसावळ ते जळगाव दिशेने समांतर दुसरा नवीन रेल्वे उड्डाणपूल तयार केला जाणार आहे. यासाठी साधारण पाच महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. अर्थात ते रेल्वेच्या ब्लॉक मिळण्यावर अवलंबून असेल.
अनेक घातपात-अपघाताचा होता साक्षी
ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल हा अनेक घातपाताचा साक्षी होता. या पुलाखाली अनेक वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडले आहेत. अनेकांनी रेल्वे रुळावर आत्महत्यासुद्धा केलेली आहे, तर कित्येक जणांची लूटही याठिकाणी झालेली आहे. तसेच पुलावरही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. या पुलावरील अनेक अनेक किस्से चर्चेत नेहमीच असतात.
पुलास पडले होते मोठे भगदाड
ब्रिटिश काळातील या जीर्ण पुलाची अत्यंत विदारक स्थिती झाली होती. पुलाच्या वर मोठे भगदाड पडले होते. याखाली जाणारी रेल्वे गाडी पुलावरून दिसत होती. कोणत्याही स्थितीत पुलावर मोठा अपघात होण्याची शक्यता होती. त्याआधीच पुलास जमीनदोस्त करण्यात आले.
लाखो रेल्वेगाड्या तसेच कोटीच्या संख्येने गेली पुलावरून व खालून वाहने
या पुलाखालील रेल्वे रुळावरून लाखो रेल्वेगाड्यांमधून देशभरातील कानाकोपऱ्यातील प्रवाशांनी अपडाऊनच्या दिशेने प्रवास केला आहे. याशिवाय पुलावरून चार चाकीसह कोट्यवधी दुचाकी वाहनांनी प्रवास केला आहे. तो आता इतिहास जमा होणार असून फक्त राहतील फक्त आठवणी...