दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

By सुनील पाटील | Published: January 4, 2024 07:26 PM2024-01-04T19:26:34+5:302024-01-04T19:27:01+5:30

राष्ट्रवादी एक कुटूंब आहे, सध्या ते विभक्त झाले आहे असे सांगून आणखीनच सस्पेन्स वाढविला.

Dilip wagh is Both factions of Pawar and he Said, Ncp are a family |  दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

 दिलीप वाघ तळ्यात, मळ्यात! पवारांचे दोन्ही गट बुचकळ्यात; म्हणाले, "राष्ट्रवादी एक कुटुंब..."

जळगाव : शिर्डी येथे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या शिबिरात व्यासपीठावर हजेरी लावलेले पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ सध्या तळ्यात, मळ्यात असून नेमक्या कोणत्या गटात हे त्यांनी गुरुवारीही स्पष्ट केले नाही. राष्ट्रवादी एक कुटूंब आहे, सध्या ते विभक्त झाले आहे असे सांगून आणखीनच सस्पेन्स वाढविला. अजित पवार गटाकडून मंत्री अनिल पाटील यांच्या शिफारशीने दिलीप वाघ यांची जिल्हा नियोजन मंडळावर नियुक्ती झाली आहे. दूध संघाच्या निवडणुकीतही ते राष्ट्रवादीसोबत नव्हते. आता राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार गटाकडे होते, मात्र अचानक शिर्डीत शरद पवार गटाच्या शिबिरात हजेरी लावल्याने ते याच गटात गेल्याच्या चर्चांना उत आला.

याच मुद्यावर ‘लोकमत’ने वाघ यांना छेडले असता, आज आपण जळगावला येऊन भूमिका स्पष्ट करणार होतो, पण जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शुक्रवारी असल्याने तेव्हाच येऊ. तुम्ही नेमके कोणत्या गटात असा थेट प्रश्न केला असता, राष्ट्रवादी एक कुटूंब आहे. सध्या ते विभक्त झाले आहे. दोन दिवसापूर्वी मी अजित पवारांना भेटलो. आज मंत्री अनिल पाटील व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्याशीही बोललो. मध्यंतरी मी या पक्षात जाणार, त्या पक्षात जाणार अशा बातम्या आल्या होत्या. पण मी कुठेच गेलो नाही. राष्ट्रवादीतच थांबलो. शेवटी काही तरी अपेक्षा असतातच, असे ते म्हणाले, मात्र नेमक्या कोणत्या गटात यावर बोलणे त्यांनी सविस्तरपणे टाळले. उद्या जळगावात येऊ, तेव्हा बोलू इतकेच ते म्हणाले.
 

Web Title: Dilip wagh is Both factions of Pawar and he Said, Ncp are a family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.