श्रावस्तीनगरातील दोन युवक वाईट संगतीत सापडले. ते लोकांचे खिसे कापू लागले. लोकांना ठगवू लागले, फसवू लागले. ते एखाद्या दु:खी माणसास बघत, तेव्हा त्याला तंत्रमंत्राच्या आधाराने सुखी बनविण्याचे आश्वासन देऊन ठकवित. एका दिवशी त्यांनी अनेक लोकांना बुद्धांच्या प्रवचन ऐकायला जाताना बघितले, ते दोघेही तेथे गेले. त्यांच्यापैकी एकाच्या कानावर जसे बुद्धांचे शब्द पडले, तो त्या मधूर वाणीनं आकर्षित झाला. तो शांतपणे बुद्धांचे प्रवचन ऐकत होता. दुस:याने त्या दरम्यान श्रोत्यांचे खिसे साफ केले. परत येताना खिसे कापणा:याने दुस:याला विचारले, ‘‘तुला काय मिळाले रे.’’
तो म्हणाला, ‘‘मी बुद्धांच्या उपदेशामुळे कोणाचाही खिसा कापला नाही.’’
हे ऐकून तो खिसेकापू उपहासानं म्हणाला, ‘‘अरे मुर्खा, तू उपदेशानं प्रभावित होऊन स्वत:ला धर्मात्मा म्हणत आहेस. अरे, आपलं व कुटुंबीयांचं पोट का त्यामुळे भरेल?’’
मित्राच्या उपहासात्मक शब्दांनी मात्र तो श्रोता डगमगला नाही. उलट त्यानं त्याची सोबत सोडली. दुस:या दिवशी तो पुन्हा बुद्धांचा उपदेश ऐकायला गेला. सत्संग संपल्यावर हा श्रोता तथागतांजवळ गेला. त्याने मित्राशी झालेली बेकी आणि आपल्या पूर्वायुष्याबद्दल त्यांना सांगितले. नंतर त्याने विचारले, ‘‘मला कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी काय करायला पाहिजे?’’
तथागत म्हणाले, ‘‘आपल्या हातांचा सदुपयोग करून मजुरी कर. सात्विक जीवन जग. मित्रानं तुला मूर्ख म्हटलं, पण तू मूर्ख नाहीस. तू शहाणा झाला आहेस. तो कुकर्मी मात्र मूर्ख आहे.’’
काही दिवसांनी तो खिसेकापू मित्र शिपायांकडून पकडला गेला. त्याची रवानगी तुरुंगात झाली. शहाणा झालेला तरुण मात्र त्या शहरातील एक प्रतिष्ठित माणूस म्हणून गणला जाऊ लागला.
निष्कर्ष- कष्टानेच जीवन समृद्ध बनते. श्रमाला चांगल्या विचारांचीही जोड असावी.