आॅनलाईन लोकमतनगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव, दि. २१ : न्याय-अन्यायाच्या निवारणार्थ माणूस शासन दरबारी, न्यायमंदिरी किंवा पोलीस ठाणे गाठतो. परंतु नगरदेवळा येथे तर चक्क अन्नपाण्याविना तहानलल्या वानरसेनेने थेट पोलीस चौकी गाठून आपली तहानभूक भागविली व जणू आपल्यावरील अन्यायाची फिर्यादच दिली. पोलीस बांधवांनी वानरांसाठी अन्न व थंड पाण्याची व्यवस्था केल्याने संतुष्ट झालेल्या वानरांनी आवारातील झाडांवरच शांततापूर्ण ठिय्या मांडला.येथून १० कि.मी. अंतरावरील अजिंठा पर्वतरांगांच्या बोडक्या व ओसाड झालेल्या जंगलातील मुक्या वन्यप्राण्यांचे अन्नपाण्याविना हाल होत असल्याचे हृदयद्रावक चित्र आहे. या जंगलातील वन्यजीव अन्नपाण्याच्या शोधार्थ गावकुसाला धाव घेत आहेत. त्यातीलच एक डझनभर वानरांचा कबिला नगरदेवळा पोलीस चौकीच्या आवारात थांबला असून, येथील पोलीस बांधव राजेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, विनोद पाटील, जिजाबराव पवार, नरेंद्र विसपुते यांनीे वानरसेनेच्या अन्नपाण्याची सोय केली.
अन्नपाण्याच्या शोधार्थ वानरसेवा थेट पोलीस चौकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:14 AM