जळगाव : ६० वर्षे वयावरील नागरिक, शारीरिक व्याधी असलेले ४५ वर्षे वयावरील व्यक्ती तसेच खासगी रुग्णालयातील कोरोना लसीकरण या विषयी घोषणा झाली असली तरी थेट लसीकरणाविषयी स्पष्ट निर्देश नसल्याने १ मार्चपासून प्रत्यक्ष लसीकरण होऊ शकणार नाही. तसेच खासगी रुग्णालयातील लसीकरण सुरू करताना ‘ड्राय रन’ की थेट लसीकरणाला सुरुवात होणार, याविषयीदेखील सूचनांची प्रतीक्षा आहे.
१ मार्चपासून खासगी रुग्णालयातही लसीकरणाला सुरुवात होणार असल्याची सरकारने घोषणा केली. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील १९ शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तर जिल्ह्यातील २८ खासगी रुग्णालयांमध्ये २५० रुपयांमध्ये लस मिळणार आहे. या सोबतच यात ६० वर्षे वयावरील नागरिकांना तसेच ४५ वर्षे वयावरील परंतु ज्यांना शारीरिक व्याधी असतील अशांनाही लस घेता येणार आहे.
खासगी रुग्णालयांना लस कोठून मिळणार?
जिल्ह्यात शासकीय रुग्णांलयांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरू करताना अगोदर ड्राय रन झाला होता. त्यानंतर प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र खाजगी रुग्णालयात लसीकरण करायचे झाल्यास तेथे अगोदर ड्राय रन घेतला जाणार की थेट लसीकरणाला सुरुवात होईल, या विषयी अद्याप निश्चितता नाही. इतकेच नव्हे या रुग्णालयांना लसीचा पुरवठा कोठून होणार हेदेखील स्पष्ट झालेले नाही.
व्यवस्थेविषयी आज मिळणार सूचना
लसीकरणासाठी लसीकरण कक्ष, लस दिल्यानंतर निरीक्षण कक्ष व इतर व्यवस्थेविषयी खासगी रुग्णालयांमध्ये काय उपाययोजना केल्या जातील, याविषयी अद्याप सूचना नाही. त्यामुळे खासगी रुग्णालयात लसीकरण व्यवस्था कशी राहणार, या विषयी सोमवारी सूचना मिळण्याची अपेक्षा आहे. १ रोजी ६० वर्षे वयावरील नागरिक, शारीरिक व्याधी असलेले ४५ वर्षे वयावरील व्यक्ती यांना केवळ नोंदणी करता येणार आहे. लसीकरण प्रक्रियेचे केवळ पोर्टल खुले होणार असून लसीकरणासाठी अजून तीन ते चार दिवस लागू शकतात.
६० वर्षे वयावरील नागरिक, शारीरिक व्याधी असलेले ४५ वर्षे वयावरील व्यक्ती तसेच खासगी रुग्णालयातील लसीकरण यासाठी १ रोजी पोर्टल खुले होणार आहे. सोमवारी यासाठी नोंदणी करता येणार आहे. लसीकरणाविषयी सोमवारी सूचना मिळू शकतात.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी.
खासगी रुग्णालयातील लसीकरण व त्यावर कोणाचे नियंत्रण राहणार, तेथे लस कोठून येणार या विषयी अद्याप सूचना नाही. सूचना मिळाल्यानंतर स्पष्टता होईल.
- डॉ. एन.एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक