जळगाव : पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील आठ जणांना शुक्रवारी पोलीस महासंचालक पदक/ बोधचिन्ह जाहीर करण्यात आले. १ मे महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते या पदकाचे वितरण होणार आहे.
जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक फौजदार शिवाजी राजाराम पाटील, लिलाकांत पुंडलिक महाले, आर्थिक गुन्हे शाखेचे शशिकांत बाबुलाल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे सुनील पंडित दामोदरे, संदीप श्रावण साळवे, जळगाव उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील विजय माधव काळे, मारवड पोलीस ठाण्याचे महेश शामराव पाटील, मनोज अण्णा मराठे यांचा त्यात समावेश आहे.
पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार २०२० मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व अमलदारांची निवड करण्यासाठी जिल्हा स्तरावर समिती गठीत करण्यात आली होती. त्यात पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक डी.एम.पाटील, पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांचा समावेश होता. या समितीने १० जणांचे प्रस्ताव पाठविले होते.