लोकमत न्यूज नेटवर्क
रावेर : येथील एका भूखंडावर स्थापित मूर्ती गायब झाल्यावर पोलिसात तक्रारी नंतर वाद टळावा म्हणून पोलिसांनी मूर्ती पूर्ववत जागेवर ठेवण्याचे आदेश दिल्यावर ही मूर्ती जागेवर ठेवण्यात आली असून हे प्रकरण आता न्यायालयात जाण्याची शक्यता आहे.
वृत्त असे की, येथील स्टेशनरोड लगतच्या मानकर प्लॉट भागातील काही रहिवाशांनी त्या वसाहतीचा खुला भूखंड गृहीत धरून चौथरा उभारून भगवान श्रीकृष्णाची मुर्ती स्थापन केली होती. दरम्यान, सोमवारी अचानक ती भगवान श्रीकृष्णाची मुर्ती गहाळ झाल्याने सदरचा वादातीत भूखंड नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी करणाऱ्या संबंधित मालकाने लांबवल्याचा आरोप असलेली तक्रार संबंधित रहिवाशांनी रावेर पोलीसात दाखल केली होती. तर संबंधित भूखंड दुय्यम निबंधक यांच्याकडील नोंदणीकृत खरेदी खताद्वारे खरेदी केला असल्याने मालकीहक्क असतांना संबंधित रहिवाशांचा बेकायदेशीरपणे सार्वजनिक वापराचे अतिक्रमण सुरू असल्याचे आरोपाची तक्रार संबंधित मालकीहक्क सांगणार्या इसमाने केली होती.
तथापि, घडल्या प्रकाराची चर्चा शहरात कर्णोपकर्णी पोहोचल्याने धार्मिक भावना दुखावू नये म्हणून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी संबंधित भूखंडावर मालकीहक्क सांगणाऱ्या इसमाला व त्याचे निकटचे नातेवाईक असलेले नगरसेवकाना तातडीने ती श्रीकृष्णाची मुर्ती जैसे थे पुनर्स्थापीत करण्याचे फर्मान सोडले. त्या अनुषंगाने संबंधित मालकीहक्क सांगणार्या इसमाने आपल्या कार्यकर्त्यांद्वारे मोटारसायकलवरून ती भगवान श्रीकृष्णाची मनमोहक मुर्ती आणून त्या चौथर्यावर पुनर्स्थापीत केली. दोन्ही परस्परविरोधी तक्रारदार सुशिक्षित असल्याने व भूखंड स्वामित्वाचा वादातीत वाद हा न्यायालयीन कार्यकक्षेतील असल्याने तुम्ही कायद्याने लढा. मात्र हकनाक भगवान श्रीकृष्णाच्या मुर्तीचा धार्मिक वादाला हात घालून कायदा व सुव्यवस्था हातात घेवू नका. अशी सक्त ताकीद देवून शांततेचा भंग होणार नाही म्हणून दोन्ही परस्परविरोधी गटांना गुन्हा प्रक्रिया अधिनियम १४९ अन्वये प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान संबंधित जागेवर मालकी दाखाविणाऱ्यांविरुद्ध सोशलमिडियावर बदनामीकारक मजकूर व्हायरल झाला होता.