जळगाव : कोरोनाच्या संकटानंतर सादर झालेला हा अर्थसंकल्प सर्वांना सावरेल अशी अपेक्षा होती, मात्र या अर्थसंकल्पाने सामान्यांची निराशा केली असून हा अर्थसंकल्प उद्योगपतीधार्जिणा असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत केले जात आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने ठोस पाऊल
अर्थसंकल्प हा अर्थव्यवस्थेला उभारी देणारा असून यातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपण ठोस पाऊल टाकले आहे. कोविडच्या कालावधीत जगभरातील अर्थव्यवस्थांना फटका बसला असताना आपण कोरोनावर मात करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलले आहेत. याच्या जोडीला अर्थव्यवस्था गतिमान करण्याचा प्रयत्नदेखील केलेला आहे. आजच्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधा, रोजगार, कौशल्य विकास आदींसारख्या विविध क्षेत्रांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली असून यातून चौफेर विकास साधला जाणार आहे.
- गिरीश महाजन, माजी मंत्री
शेतकरी धोरणाला हरताळ
देशातील पायाभूत सुविधा मजबूत करण्याची मोदी सरकारची घोषणा होती. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाल दीडपट हमीभाव देण्याचे सरकारचे उद्दिष्ट होते. ज्या मुद्यांवरून दिल्लीच्या वेशीवर लाखो शेतकरी आंदोलन करीत आहे. तोच मुद्दा या अर्थसंकल्पात दिसून येत नाही. हमीभावापोटी शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपये दिल्याचे आकडे फुगवून सांगितले जात आहेत. प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या खात्यावर उत्पादनाचा खर्च निघेल एवढीदेखील रक्कम जमा झाली नाही. जगभरात कोरोना महामारीने अर्थव्यवस्था मोडकळीस आली. अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या दृष्टीने देखील ठोस धोरणांचा अभाव अर्थसंकल्पात आहे. सर्वसामान्यांसह शेतकरी हिताच्या धोरणाला यंदाच्या अर्थसंकल्पातही मोदी सरकारने हरताळ फासला आहे.
- डॉ. उल्हास पाटील, प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस.
निराशाजनक
हा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. कोरोना काळात सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र फारसे काही पदरी पडलेले नाही. कृषी क्षेत्राचीही निराशा आहे. उद्योगांसाठी हा अर्थसंकल्प आहे. सर्वसामान्यांचे यामुळे कंबरडे मोडले जाणार आहे.
- ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष, कॉंग्रेस
सर्वच क्षेत्राची आर्थिक हानी झाली असताना आवश्यक उपाययोजना नाही. आरोग्यासाठी हवी तेवढी तरतूद नसून शेतीसाठीही आवश्यक घोषणा नाही.
- ॲड. रवींद्र पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस.
महाराष्ट्राला ठेंगा
आकस तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्याच राज्यांना भरीव मदत, महाराष्ट्राला ठेंगा, नाशिक व नागपूरलासुद्धा राजकीय हेतूने मदत, रोजगार देण्याऐवजी कंपनीतील तरुणांना बेरोजगार करणारा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांना नवी योजना नाही, म्हणून हा राजकीय हेतूने प्रेरित अर्थसंकल्प आहे.
- गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख, शिवसेना