- जिजाबराव वाघजळगाव - उत्तर महाराष्ट्रातील मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या गिरणा धरणातून सोमवारी सकाळी ८ वाजेपासून ३४ हजार ६८४ क्युसेसचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. नदी काठच्या गावांना गिरणा पाटबंधारे विभागाने सर्तक राहण्याच्या सूचना रविवारी रात्रीचं दिल्या होत्या. ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरणातूनही सोमवारी सकाळपासून ४ हजार ९८३ क्युसेसचा विसर्ग होत आहे. दोन्ही नद्यांमध्ये विसर्ग होणारे पाणी पाहता पूरही येण्याची शक्यता आहे. नागरिकांना देखील सर्तक राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून गिरणा धरण परिसरात जोरदार पाऊस होत आहे. धरणाच्या वरील सर्व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने पाण्याची आवक वाढली आहे. रविवारी दूपारी १२ वाजता ४९५२ तर सायंकाळी ६ वाजता ७४२८, रात्री आठ वाजता धरणाचे १ ते ६ क्रमांकाचे व्दार २ फुटाने उघडण्यात आले. यातून ९९०४ क्युसेस तर रात्री ९ वाजता १४८५६, रात्री १२ वाजता १७३३२ सोमवारी सकाळी ६ वाजता २२२८४ आणि सकाळी ७ वाजता २९ हजार ७१२ क्युसेस पाणी नदीत सोडण्यात आले आहे. रविवारी रात्री व सोमवारी पहाटे गिरणा धरणात ३० ते ३५ क्युसेसची आवक सुरु होती. त्यामुळेच सोमवारी सकाळी २९ हजार ७१२ इतका विसर्ग वाढविण्यात आला आहे.