आयुक्तांचे आदेश : कार्यालयीन वेळेत उपस्थित राहणे बंधनकारक
जळगाव : मनपातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन कामकाजाचे नाव सांगून बाहेर फिरत असल्यामुळे, कामानिमित्त मनपात येणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होत आहे. त्यामुळे आयुक्तांनी या कामचुकार कर्मचाऱ्यांना सोमवारपासून कार्यालयीन वेळेत हजर राहणे बंधनकारक केले असून, जे कर्मचारी-अधिकारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी शुक्रवारी केलेल्या पाहणीत मनपातील विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या कार्यालयाच्या वेळेत मनपात उपस्थित न राहता, कार्यालयीन कामकाजाचे कारण सांगून मनपाच्या मुख्य इमारतीत तर काही कर्मचारी युनिट कार्यालयात गेल्याचे सांगण्यात आले. परंतु, आयुक्तांनी केलेल्या शहानिशेत हे कर्मचारी मुख्य कार्यालयात वा युनिट कार्यालयात आढळून आले नाहीत. त्यामुळे मनपात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी या कामचुकार कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी मुख्य कार्यालयाच्या वेळेनुसार सकाळी ९.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत कार्यालयात उपस्थित राहणे बंधकारक आहे. तर बाहेर जायचे असल्यास त्याची रजिस्टरमध्ये नोंद करणे आवश्यक आहे. तर जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित न दिसल्यास अशा कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.
इन्फो :
ओळखपत्र नसल्यास होणार दंडात्मक कारवाई
आयुक्तांनी सोमवारपासून प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्यांना ओळखपत्र बंधनकारक केले आहे. जर संबंधित कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र नसल्यास अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेश दिले आहेत. दरम्यान, मनपातील सर्व विभागप्रमुखांनी या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.