हितेंद्र काळुंखेजळगाव: जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी विविध कामांसह कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचे कामही सुरु केले आहे. यासाठी काही ठिकाणी अचानक भेटी देवून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये धाक निर्माण केला आहे. असे असले तरी हा असर जास्त काळ टिकत नाही, असेच दिसून येते. कारण गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत काही विभागांमध्ये अचानक भेटी देवून कामाच्या वेळेत कार्यालयात हजर नसलेले तसेच रजा न घेता कार्यालयातच न आलेले ... अशा काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. यानंतर पुन्हा एकदा अचानक मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोन विभागांना भेटी देवून झाडाझडती केली होती. यावेळी सर्व व्यवस्थित आढळले मात्र दोन दिवसांपूर्वी पंचायत समितीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पाटील यांनी अचानक भेट दिली असता गटविकास अधिकारी यांच्यासह १० कर्मचारी कार्यालयातच नव्हते. याची दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या महिन्यात पाचोरा पं. स. मध्येही अचानक भेट दिली असता गैरहजर असलेल्या पाच अभियंत्यांना थेट निलंबित केले होते. ही बाब लक्षात घेता इतरांनी सावध होणे गरजेचे असताना तसे झाल्याचे दिसत नाही. जळगाव पंचायत समितीला तर हा धाक अधिक असायला हवा, कारण मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे जळगाव येथेच कार्यालय असल्याने ते केव्हाही आपल्याही पंचायत समितीत भेट देवू शकतात हे संबंधितांनी गृहीत धरायला हवे होते. परंतु दुर्लक्ष करण्याचा मानवी स्वभाव या सर्वांना नडला. यामुळेच शिस्तीचा हा बडगा एकदा किंवा दोनदा नव्हे तर नेहमीच उगारणे गरजेचे आहे.
शिस्तीचा बडगा कायम असावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 3:10 PM