जळगाव - महानगरपालिका प्रशासनने शहर पथ विक्रेता समिती गठित करण्याबाबत जाहिरात दिली होती. मात्र, यामध्ये राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ किंवा पथविक्रेता अधिनियम २०१४ कोणत्या परिपत्रकानुसार गठीत करण्यात येणार आहे. याबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे याबाबत मनपाने खुलासा करावा या मागणीसाठी जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीतर्फे गुरुवारी महापौर भारती सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा हॉकर्स संघर्ष समितीचे पदाधिकारी सुनील सोनार, मोहन तिवारी, दिनेश हिंगणे, सुरेश चौधरी, प्रभाकर तायडे, सुनील जाधव, रवि महाजन, किशोर नेवे आदी उपस्थित होते.
‘त्या’ बिबट्याच्या मृत्यूचे कारण अस्पष्ट
जळगाव - गेल्या आठवड्यात ममुराबाद शिवारात मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्याच्या मृत्यूचे कारण अजुनही स्पष्ट झालेले नाही. बिबट्याचा मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर यासंबधीचा अहवाल नाशिक येथे पाठविण्यात आला असून, अजूनही नाशिकहून व्हिसेराची तपासणी झालेली नाही. यामुळे बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे समजू शकले नाही. तसेच नेमका बिबट्या आला कोठून ? याचेही कारण वनविभागाला समजू शकलेले नाही.
शिवाजीनगरातील अस्वच्छतेबाबत तक्रार
जळगाव - शहरातील शाहूनगर, शिवाजीनगर, पिंप्राळा रोड भागातील वस्तीत मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेची समस्या निर्माण झाली असून, नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील समस्यांकडे लक्ष देण्यात यावे या मागणीसाठी अल्पसंख्यांक सेवा संघातर्फे मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जहांगीर खान, याकुब खान यांच्यासह या भागातील नागरिक उपस्थित होते.
शिवाजीनगर उड्डाणपुलाचा विद्युत खांबाचा अडथळा दुर होणार
जळगाव - शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरत असलेल्या विद्युत खांब हटविण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे. महापौर भारती सोनवणे यांनी २५ कोटीच्या निधीतून शिल्लक असलेल्या दीड कोटी रुपयांचा निधी हे विद्युत खांब हटविण्यासाठी देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. तसेच येणाऱ्या महासभेत हा प्रस्ताव देखील सादर केला जाणार आहे. विद्युत खांबाच्या प्रश्नामुळे पुलाच्या कामावर देखील परिणाम झाला होता. आता हा प्रश्न मार्गी लागल्यास पुलाचे काम देखील वेगात होण्याची शक्यता आहे.