मनपाकडून चार दुकाने सील
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शहरातील मार्केटमधील व इतर दुकानांना गर्दीबाबत सजग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही अनेक दुकानांमध्ये प्रमाणाबाहेर ग्राहकांची गर्दी होत आहे. शुक्रवारी मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडून महात्मा फुले मार्केटमधील चार दुकाने सील करण्यात आली. प्रत्येक दुकानदाराला प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंडदेखील मनपाने ठोठावला आहे.
आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करा
जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. मात्र, मनपा प्रशासनाकडून वसुलीचे कारण पुढे करून, हा वेतन आयोग लागू करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. इतर महापालिकांमध्ये हा आयोग लागू होऊ शकतो तर जळगाव मनपात हा आयोग का लागू होत नाही, असा प्रश्न भगतसिंग महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल नाटेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू करा, अशी मागणी नाटेकर यांनी केली आहे.
दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा
जळगाव : गेल्या तीन ते चार दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस सुरू आहे. यामुळे पावसाची वाट पाहत असलेला बळीराजा आनंदात असून, खरिपाची पिकेदेखील आता चांगल्या प्रकारे वाढू लागली आहेत. दरम्यान, आगामी दाेन दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने जिल्ह्याला यलो झोनमध्ये ठेवले असून, काही दिवसांत जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.