लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या पंधरा दिवसात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने तब्बल १२० दुकाने सील केली आहेत. मात्र तरीही शहरातील दुकानदारांकडून नियम भंग करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. शुक्रवारी शहरात लपून छपून व्यवसाय करणारी १९ दुकाने सील करण्यात आली आहेत. दरम्यान, प्रसिद्धी माध्यमातील छायाचित्रकार मनपाच्या पथकाच्या नावाने हप्तेखोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने फुले मार्केट परिसरातील पाच दुकाने तर कोंबडी बाजार, बी.जे.मार्केट परिसरातील चार दुकाने सील करण्यात आली आहेत. अनेक दुकानांमध्ये ३० हून अधिक ग्राहक आढळून आले. तर काही सलून दुकानांमध्ये देखील बाहेरून बंद मात्र आतून सर्व दुकाने सुरू असल्याचेही आढळून आले.
आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने आतापर्यंतची केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. महापालिकेने यावेळी ९५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच अनेक विक्रेत्यांना महापालिकेने संपूर्ण निर्बंध काळात दुकाने बंद का करू नये याबाबत देखील नोटिसा बजावल्या आहेत.
या दुकानांवर करण्यात आलेली कारवाई
कोंबडी बाजार परिसरातील राजस्थान वेल्डींग वर्क, नॅशनल प्लास्टिक स्टोअर, बीजे मार्केट मधील श्रीराज ऑटो, महाराष्ट्र पॅंटला हाऊस, वेद प्रिंटर्स, अनंत हेअर आर्ट, आकाश शूज सेंटर, पुष्पा कलेक्शन, राधिका ड्रेसेस, मेट्रो ड्रेसेस, दीपक किचन, विशाल युनिफॉर्म या दुकानांवर कारवाई केली आहे.
हप्ते घेणाऱ्या छायाचित्रकार वर गुन्हा दाखल होणार
मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या नावावर शहरातील दुकानदारांकडून एका प्रसिद्धी माध्यमातील छायाचित्रकारकडून हप्ते घेत असल्याची तक्रार मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांच्याकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार काही दुकानदारांनी व्हिडिओ छायाचित्रण करून याबाबतचे पुरावे मनपा उपायुक्तांकडे सादर करण्यात आले. त्यावर संबंधित छायाचित्रकारावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त संतोष वाहूळे यांनी दिली आहे.