भालोद, ता.यावल : आगामी महिन्यात होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची चर्चा व उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामपंचायत निवडणुका जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात आहेत. यामुळे इच्छुक उमेदवार वार्डातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन करीत आहे. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसा इच्छुकांमधील उत्साह वाढत आहे. मात्र शासनाकडून नुकत्याच प्राप्त झालेल्या आदेशानुसार निवडणुकांनंतर सरपंच आरक्षण जाहीर होणार असल्याने सरपंच पदासाठी इच्छुकांनी बाशिंग बांधले आहे. कोणत्या प्रवर्गातून सरपंच आरक्षण निघेल अशी उत्सुकता इच्छुकांमध्ये आहे.गेल्या पंचवार्षिकीत सरपंच अनुसूचित जाती एस.सी.प्रवर्गातील महिला होत्या, तर आता एसटी प्रवर्गातील पुरुषासाठी सरपंच पद असेल, अशीही चर्चा ग्रामस्थांमधून होताना दिसून येत आहे. सध्या ठिकठिकाणी ग्रामस्थ शेकोटी भोवती बसून ग्रामपंचायतीच्या निवडणुकांच्या चर्चांना ऊत आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत किती पॅनल असतील, किती उमेदवार असतील, त्यांची रचना करणे अशा महत्त्वाच्या बाबींकडे पॅनल प्रमुख यांनी लक्ष केंद्रित केले आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही यावेळेस लढतीत मोठी चुरस असणार असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. जसजशा निवडणुका जवळ येत आहे तसतशी रंगत वाढत आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकांविषयी शेकोटीभोवती चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 2:25 PM