जामनेर : येथील बजरंगपूर भागातील तरुण संजय प्रभाकर चव्हाण याचा खून झाल्यानंतर संशयित आरोपी असलेल्या एसटी वाहक पुंडलीक पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर घटनेमागील कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहे. सकृतदर्शनी संजयच्या खुनाला समलैंगिक संबंधाची किनार असल्याची चर्चा असली तरी हेच एकमेव कारण असू शकत नाही असा कयास पोलिसांचा आहे.अनैतिक संबंधांचाही संशय पोलिसांना आहे.संजय चव्हाण याला आई व चार बहिणी आहेत. पूर्वी तो मोबाईल दुरुस्तीचे काम करीत असे. वाहक पुंडलिक पाटील यांचेशी त्याची मैत्री होती. पाटील हे २००९ पासून एसटीत वाहक होते. नासिक विभागात पिंपळगाव बसवंत आगारात ते कार्यरत होते. २०१४ ला ते जामनेर आगारात रुजू झाले.पाटील हे मूळ सामरोद, ता. जामनेर येथील रहिवाशी असून त्यांचे पश्चात आई, वडील, पत्नी,भाऊ व मुलगा आहे. एसटीत लागण्यापूर्वी त्यांनी कृषी पदविका कोर्स केला होता. जामनेरला राहायला आल्यानंतर त्यांची संजय चव्हाणशी ओळख झाली. या ओळखीचे मैत्रीत रूपांतर झाले. दोघांचे एकमेकांकडे येणे जाणे वाढले. संजयचे अनैतिक संबंध असावे असा संशय पाटील याना आल्याने त्यांनी त्याचा खून केला असावा अशी शक्यता वाटत असल्याने पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहे.संजय चव्हाण व पुंडलीक पाटील हे दोघे भुसावळ रस्त्यावरील औद्योगिक वसाहत परिसरात नेहमीच फिरायला जात असल्याचे अनेकांनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. घटना घडली त्या दिवशी देखील दोघांना दुचाकीवर जाताना पाहिल्याचे सांगण्यात आले.संजय हा मनमिळाऊ स्वभावाचा तरुण होता. एकुलता एक तरुण मुलगा अचानक निघून गेल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच्या चारही बहिणीचे लग्न झालेले आहे. या दु्दैवी घटनेने दोन कुटूंब उघड्यावर आल्याने त्याबाबत समाजात हळहळ व्यक्त केली जात आहे.