लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सिनेमे अनेक येतात पण अभिजात सिनेमा निर्माण होण्यासाठी जी वैशिष्ट्ये लागतात, ती सारी सुमित्रा भावे दिग्दर्शित दिठी सिनेमामध्ये दिसून येतात, असे मतपरिवर्तन आयोजित दिठी सिनेमावरील चर्चेत मान्यवरांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ कथाकार दि.बा. मोकाशी यांच्या आमोद सुनासी आले, या कथेवर आधारित हा सिनेमा सध्या मराठी सिनेविश्वात गाजतो आहे. या सिनेमावर चर्चा व्हावी व सिनेमाची निर्मिती प्रक्रिया, कलावंतांनी भूमिकेचा घेतलेला शोध यावर विचारमंथन व्हावे, यासाठी परिवर्तन फिल्म क्लबतर्फे ऑनलाइन चर्चेचे आयोजन करण्यात आले होते.
परिवर्तनचे अध्यक्ष शंभू पाटील यांनी माहिती दिली. या चर्चेत अभिनेते व दिठीतील प्रमुख भूमिका साकारणारे किशोर कदम यांनी त्यांच्या भूमिकेचे मर्म उलगडून दाखवले.
सिनेमात पारूबाईची भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सुभाष यांनी या सिनेमातील वियोगाचे सार्वत्रिक होणं मांडले.
कथाकार व कवी बालाजी सुतार यांनी सिनेमातील गोष्ट व कलावंतांच्या कामातून सहजपणे उभी राहिलेली पात्रं रसिकांच्या मनाचा ठाव किती सहजपणे घेतात, याची मांडणी केली. सूत्रसंचालन प्रतीक्षा कल्पराज व हर्षदा कोल्हटकर यांनी केले, तर आभार प्रा. मनोज पाटील यांनी मानले. चर्चेचे आयोजन परिवर्तन फिल्मप्रमुख सुदीप्ता सरकार व प्रा.डॉ. किशोर पवार यांनी केले होते.
वारकरी संप्रदायातील अध्यात्म, विठ्ठलाची ओढ दिठी या सिनेमातून दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी प्रभावीपणे मांडली.
या सिनेमातील वियोगाचे सार्वत्रिक होणं मांडले. सिनेमातील दुःख ही व्यक्ती, पात्रांची न राहता ती समष्टीची होतात म्हणून दिठी सिनेमा निर्माण होऊ शकला. मीही हा सिनेमा प्रेक्षक म्हणून पाहिला तेव्हा अश्रूंना वाट करून दिली होती.
गायीच्या बाळंतपणातून व अमृतानुभवातलं जाणवलेलं एकरूपत्व, अद्वैतत्वाचा अनुभव हे जगण्याचं संचित मला सिनेमाने दिले, असे मनोगत सिनेमात पारूबाईची भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सुभाष यांनी व्यक्त केले.