जळगाव : स्थानिक पातळीवर पक्षांतर्गत बदल करण्यासदंर्भात पक्ष पातळीवर चर्चा करण्यात येऊन आवश्यक ते बदल निश्चितपणे केले जातील, अशी माहिती काँग्रेसच्या जिल्हा प्रभारी डॉ. हेमलता पाटील यांनी बुधवारी संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी त्यांनी राफेल विमान खरेदी व्यवहाराव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयावर बोलण्यास नकार दिला.राफेल विमान खरेदी व्यवहारासंदर्भात जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात आले होते. त्या साठी डॉ. पाटील या शहरात आल्या होत्या. आंदोलन व पक्षाची बैठक होऊन संध्याकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी डॉ. हेमलता पाटील यांच्यासह प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, महानगराध्यक्ष डॉ. ए. जी. भंगाळे, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील आदी उपस्थित होते.सर्वसामान्यांच्या पैशाला चुनाराफेल विमान खरेदीत ४१ हजार कोटी रुपयांच्यावर गैरव्यवहार करीत मोदी सरकारने सर्वसामान्यांच्या पैशाला चुना लावल्याचा आरोप या वेळी डॉ. हेमलता पाटील यांनी केला. देशातील स्थानिक कंपनीकडून विमान खरेदी न करता निवडणुकीत मोदी यांना मदत करणाऱ्यांना उद्योगांना वाचविण्यासाठी दुसºया कंपनीशी नरेंद्र मोदी यांनी करार केल्याचे त्या म्हणाल्या. शेतकरी कर्जमाफी, इंधन दरवाढ यावरही त्यांनी टीका केली.‘राफेल’शिवाय इतर विषय नकोया वेळी पक्षाच्या स्थानिक पातळीवरील स्थितीबाबत व इतर विषयांवर प्रश्न विचारले असता डॉ. हेमलता पाटील यांनी केवळ राफेल विमान खरेदी व्यवहारासाठीच ही पत्रकार परिषद असल्याचे सांगून इतर विषयांवर बोलण्यास नकार दिला. मात्र पक्षांतर्गत बदल संदर्भातच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, बदल करण्यासाठी पक्षपातळीवर चर्चा करण्यात येऊन आवश्यक ते बदल निश्चितपणे केले जातील.जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही येथे येत राहू अशीही माहिती त्यांनी दिली.पक्षाच्या सचिवांचा पत्रकारांना भेटण्यास नकारपक्षाच्या ब्लॉक विषयी माहिती घेण्यासाठी शहरात आलेले अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव चेल्ला वामशी चांद रेड्डी हे पत्रकारांना भेटणार नसल्याचे सांगण्यात आले. पत्रकार परिषदेस ते का उपस्थित नाही, या विषयी डॉ. हेमलता पाटील यांना विचारले असता रेड्डी हे ब्लॉकची माहिती घेत असून ते पत्रकार परिषदेस येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पक्ष पातळीवर चर्चा होऊन बदल शक्य - काँग्रेस प्रभारी डॉ. हेमलता पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2018 12:59 PM