अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथील राजकोरबाई कोळी या महिलेची अत्यल्प ऑक्सिजन असताना कोरोनातून ठणठणीत बरी झाल्याची ‘लोकमत’च्या पॉझिटिव्ह बातमीला राज्यभरातून प्रतिसाद मिळाला असून अनेकांनी तिला सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.
ऑक्सिजन पातळी ९५च्या खाली गेल्यानंतरदेखील रुग्णाला धोका आहे असे सांगितले जाते. त्यात ५० टक्केपेक्षाही कमी म्हणजे अवघा ३८ ऑक्सिजन आणि एचआरसीटी स्कोर १९ व रक्तदाब असताना जिथे खासगी दवाखान्यात डॉक्टरांच्या आशा मावळल्या होत्या. निराशेने तिला अंतिम समय जवळ आला म्हणून घरी घेऊन जायला सांगितले असता, निव्वळ अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्न आणि रुग्णाला दिलेली जगण्याची उमेद यामुळे राजकोरबाई मृत्यूच्या दाढेतून परत आली. एकीकडे कोरोनामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे, औषधांच्या दुष्परिणामाने इतर विविध आजारांची लागण होत आहे. त्यात एवढ्या कमी ऑक्सिजन पातळीवर रुग्ण वाचणे ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरली. म्हणूनच माजी गृहमंत्री अनिल देशमुख, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, इंसिडन्ट कमांडर, अभ्यासक यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत डॉक्टरांनी या बातमीला व्हायरल करून अमळनेरच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांशीही संपर्क साधला.
आधीच खासगी दवाखान्यात १९ ते २० दिवस उपचार करून शासकीय रुग्णालयात गंभीर परिस्थितीतदेखील डॉक्टरांनी तिच्यावर तब्बल महिनाभर उपचार केले. कोरोनासारख्या महामारीत या आजारावर अजून परिपूर्ण औषधी सापडली नसताना, इतर औषधांचे दुष्परिणाम होत असताना मांडळ येथील राजकोरबाई कोळी हिचे उदाहरण सर्वांसाठी आदर्श ठरले आहे. त्यामुळेच लोकमतच्या या पॉझिटिव्ह बातमीची चर्चा असून ती व्हायरल होत आहे.