जळगाव : पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या तपासणी दरम्यान आठ खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर अस्वच्छतेसह अनेक त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.पावसाळ््याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने खाद्य पदार्थ तपासणी मोहीम राबविली जात आहे. त्यात बुधवारी बसस्थानक परिसर, महात्मा गांधी उद्यान परिसर, महामार्गावर आयटीआयनजीक असलेल्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी विवेक पाटील, सुवर्णा महाजन यांनी केलेल्या या तपासणीमध्ये खाद्य पदार्थ झाकून न ठेवता उघड्यावरच असल्याचे आढळून आले. या सोबतच अस्वच्छ पाणी, हातमोजे, डोक्यात टोपी नसल्याचे आढळले. तसेच बाजूला सडके अन्न असल्याचे दिसून आले. या सर्व खाद्य पदार्थ विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या असून अन्न सुरक्षा मानकांनुसारच खाद्य पदार्थ विक्री करण्याचे निर्देश दिले.ज्या विक्रेत्यांकडे त्रुटी आढळून आल्या त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.या पूर्वीही ३ जुलै रोजी रेल्वे स्थानक परिसर, नेहरु चौक परिसरात चायनीज खाद्य पदार्थांच्या हातगाड्यांवर तपासणी करून नऊ ठिकाणचे नमुने घेण्यात आले होते.पावसाळ््यात ही तपासणी मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त वाय.के. बेंडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
जळगावात खाद्य पदार्थांच्या आठ हातगाड्यांवर आढळली अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:51 AM