जामनेर : टाटा मिठाचा बनावट साठा येथील मयूर ट्रेडर्समधून गुरुवारी पोलिसांनी जप्त केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाईनंतर सावध झालेल्या इतर दुकानदारांनी त्यांच्याकडील बनावट मिठाच्या साठ्याची विल्हेवाट लावल्याची माहिती मिळाली आहे.कोमल एजन्सीकडून आणखी कोणी मिठाचा साठा घेऊन त्याची विक्री केली याबाबत पोलीस तपास करीत आहे. मोहम्मद हुसेन चौधरी (रा.जोगेश्वरी, पश्चिम, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजकुमार प्रकाशचंद कावडिया (रा.बजरंगपुरा, जामनेर) यांच्या कोमल एजन्सी दुकानातून व बाजार समितीच्या दुकान नंबर १६ मधून ३ लाख १२ हजार रुपये किमतीच्या बनावट टाटा सॉल्ट कंपनीच्या ३१२ गोण्या जप्त केल्या. टाटा सॉल्ट कंपनीचे स्वामित्व अधिकाराचे उल्लंघन करून विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने भादंवि कलम ४८२, ४८६, प्रतिलिपी अधिकार अधिनियम १९५७ (सुधारित अधिनियम १९८४ व १९९४ चे कलम ५१, ६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. लॉकडाऊन काळात शहरातील काही किराणा व्यावसायिक भेसळ केलेल्या खाद्य तेलाचा साठा करीत असून, त्याची विक्री केली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. महसूल विभागाने तपासणी केली, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने खुलेआम तेल विक्री सुरूच राहिली. राजकीय अभय असल्याने अशा व्यापाऱ्यांना कारवाईची भीती नाही. जामनेर येथून तालुक्यातील ग्रामीण भागातील छोटे किराणा दुकानदार तेल, मीठ विक्रीसाठी नेतात. बनावट मीठ व भेसळयुक्त तेलामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळाला जात असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. काही नागरिक याबाबत ग्राहक न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात आले.