लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील हॉकर्सला मुख्य बाजारपेठ व शहरातील रस्त्यालगत व्यवसाय करण्यास बंदी असताना मार्केटमध्ये व्यवसाय करणाऱ्यांवर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांच्या पथकाने कारवाई केली आहे. मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास झालेल्या कारवाईदरम्यान मनपा कर्मचारी व हॉकर्समध्ये चांगलाच वाद झाला. यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन विक्रेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील हॉकर्स व मनपा कर्मचाऱ्यांमधील लपवाछपवी सुरू आहे. महापालिकेचे पथक रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईसाठी शहरभर फिरत असून, विक्रेतेदेखील मनपा कर्मचाऱ्यांना चकवा देत मिळेल त्या ठिकाणी आपला व्यवसाय थाटत आहेत. मंगळवारी फुले मार्केट परिसरात दुपारी बारा वाजेच्या सुमारास अनेक विक्रेत्यांनी दुकाने लावल्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर मनपा उपायुक्त संतोष वाहुळे व शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी या ठिकाणी दाखल झाले. मनपाचे पथक दाखल होताच विक्रेत्यांनी या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे मार्केटमध्ये चांगलाच गोंधळ उडाला.
साहित्य जप्त करण्यावरून झाली वादाला सुरुवात
मनपा कर्मचाऱ्यांनी फुले मार्केटमध्ये दाखल होताच विक्रेत्यांचा माल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विक्रेते व मनपा कर्मचाऱ्यांमध्ये चांगलाच वाद निर्माण झाला. मनपा कर्मचाऱ्यांनी माल जप्त केल्यानंतर काही विक्रेत्यांनी थेट मनपाच्या वाहनांमध्ये जाऊन आपले साहित्य सोडविण्याचा प्रयत्न केला, तर काही जणांनी आपला माल घेऊन या ठिकाणाहून पळदेखील काढला. या वादावादीमध्ये काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांना शिवीगाळ देखील केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनमध्ये तीनजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपायुक्त यांनी दिली आहे.
दोन ट्रॅक्टर माल जप्त
महापालिकेने हाॅकर्सवर कारवाई करत दाेन ट्रॅक्टर माल जप्त केला हाेता. पालिका व्यवसाय करू देत नसल्याचा राग व्यक्त करत काही हाॅकर्सने थेट ट्रॅक्टरमधील माल ओढून नेल्याने तणाव वाढला हाेता. याप्रकरणी अंकुश पवार, ज्ञानेश्वर पवार व भरत पवार यांच्याविरुद्ध पाेलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.