लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपुलाच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाने १ कोटी ५० लाखांचा निधीला गेल्या महासभेत मंजुरी दिली. मात्र, हे विद्युत खांब हटविण्याचे काम महावितरणला न देता मनपाकडेच ठेवल्याने आमदार सुरेश भोळे व भाजपच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. ही खडाजंगी शुक्रवारी झाली असून, आता या वादाच्या चर्चा महापालिकेत रंगू लागल्या आहेत. पक्षबैठकीत ठरल्यानुसार विद्युत खांब हटविण्याचे काम मनपाकडे न देता, महावितरणकडे देण्याचे ठरले होते. मात्र, महासभेत मनपाकडेच हा विषय देण्याचा ठरल्यामुळे आमदार भोळे नाराज झाले होते.
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांमधील गटबाजी अनेकदा उघड झाली आहे. मात्र, आता थेट आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांच्या निर्णयाविरोधातच नगरसेवक भूमिका घेत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या महासभेत दोन विषयांवरून नगरसेवकांनी थेट पक्ष नेतृत्वाने ठरविलेल्या विषयाचा विरोधात आपले मत मोकळे केले आहे. यामुळे भाजपातील गटबाजी आता थेट बंड पुकारण्याचा तयारीतच असल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतागृहांसाठी ५० लाखांचा निधी मंजूर केला होता. तसेच सामाजिक संस्थांकडून आलेल्या प्रस्तावालाही मान्यता द्यावी व ५० लाखातूनही स्वच्छतागृह तयार करावीत, असा निर्णय पक्षाच्या बैठकीत झाला होता. मात्र, ॲड. शुचिता हाडा यांनी याविरोधात आपली भूमिका महासभेत मांडली.
आमदारांच्या कार्यालयात झाला वाद
१. शिवाजीनगर उड्डाणपुलावरील विद्युत खांब हटविण्यासाठी मनपाने १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, हे काम महावितरणकडून करण्यात यावे अशा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी पक्षाच्या बैठकीत दिल्या होत्या. मात्र, महासभेत हे काम महावितरणकडून न करता मनपाकडूनच करण्यात यावे असा ठराव करण्यात आला. त्यामुळे आमदार सुरेश भोळे यांनी नगरसेवकांच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त केली.
२. भाजपच्या ८ ते ९ नगरसेवकांनी आमदार भोळे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटीत नगरसेवकांनी हे काम मनपाकडूनच व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. त्यावर आमदार भोळे यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपचे शिवाजीनगर भागातील नगरसेवकांचा आमदार भोळेंसोबत शाब्दिक वाददेखील झाला. यावेळी आमदार भोळे यांनी नगरसेवकांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र, हा वाद वाढत गेल्याने इतर नगरसेवकांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला.
भाजपातील गटबाजीची बंडाकडे कूच?
भाजपातील वाढत जाणारी गटबाजी आता बंडाकडे कूच करताना दिसून येत आहे. पक्षाच्या बैठकीत ठरलेल्या विषयांना थेट नगरसेवकांकडून महासभेत आव्हान दिले जात आहे. तर काही विषयात तर पक्षाच्या बैठकीत ठरलेले निर्णय महासभेत बदलविले जात आहेत. यामुळे भाजपमधील वाद भविष्यात बंडाचे स्वरूप घेण्याची शक्यता आहे. त्यातच पुढील महिन्यात महापौर, उपमहापौरांचा कार्यकाळ संपत असून, नवीन महापौर, उपमहापौर निवडीच्या वेळेसही याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.